सांगोला – महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार सांगोला येथील माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या तीन समाजसेविका महिलांना जाहीर झाला आहे. सन २०२०-२१ साठी माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या सदस्या व भा.स्त्री शक्ति संचालित मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्रच्या अध्यक्ष अॅड.राजेश्वरी केदार, सन २०२१-२२ साठी माता बालक व मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र, सांगोल्याच्या सचिव वसुंधरा कुलकर्णी, तर सन २०२३-२४ साठी माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक सदस्या नीलाताई देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.

वंचित, पीडित महिलांचे प्रश्न मांडणे, समुपदेशनातून कुटुंब स्थैर्य घडविणे, माता-बालकल्याणासाठी सातत्याने कार्य, संवेदनशीलता व समाजहिताचा दृष्टीकोन यावर आधारित या तिन्ही महिलांच्या कार्याची राज्यस्तरावर नोंद घेऊन हा सन्मान जाहीर झाला.

तिन्ही मान्यवर समाजसेविका बहिणींचे माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष, कार्यकारिणी, सदस्यवर्ग व संपूर्ण परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
















