सोलापूर – समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर व्हावी,यासाठी लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली असून ती यशस्वी करण्यासाठी लोकांना त्यांचे अधिकार, हक्क माहित असणे गरजेचे आहे. शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे, त्याकरिता कायद्याचे ज्ञान देण्याबरोबरच सर्व् शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून शासकीय कल्याणकारी योजनांचा महामेळावा म्हणजेच महाशिबीर या उपक्रमांचे आयोजन केले असून विधी सेवा देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयातील सोलापूर जिल्ह्याचे न्यायिक पालक न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी वडाळा येथील माऊली महाविद्यालयात महाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या महाशिबीराचे उद्घाटन न्यायमूर्ती जमादार व न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती जमादार बोलत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा सत्र् न्यायालयातील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा, पोलीस आयुक्त एम.राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निराळी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बाबासाहेब जाधव यावेळी विचारपीठावर उपस्थित होते.
न्यायमूर्ती जमादार पुढे म्हणाले, न्यायापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी घटनेला अभिप्रेत असलेले विधी सेवा प्राधिकरण 1987 साली सुरु झाले तेव्हा फक्त गरीबांना त्यांचे न्यायालयातील तंटे चालविण्यासाठी वकील उपलब्ध करुन देणे एवढेच काम होते. मात्र, यामुळे सामाजिक व आर्थिक विषमता दूर होत नाही, हे लक्षात आल्यानंतर हक्क व अधिकाराबद्दल ज्ञान देण्याचा दुसरा टप्पा सुरु झाला.त्यानंतर सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी लोककल्याणकारी राज्य, ही प्रजासत्ताक राज्याची संकल्पना यशस्वी करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत लोककल्याणासाठी असलेल्या योजना प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजे, या उद्देशाने विधी सेवा प्राधिकरणाचा महाशिबीर हा तिसरा टप्पा सुरु झाला असून केवळ योजनेसाठी आर्थिक तरतूद करुन उद्देश साध्य होणार नाही. तर प्रत्येक पात्र लाभार्थीपर्यंत त्या योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे, हा विधी सेवा प्राधिकरणाचा उद्देश आहे.
न्यायमूर्ती पुनीवाला म्हणाले, “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत म्हणजेच गरीबातल्या गरिबांना सहज न्याय मिळावा, हे महात्मा गांधींना अभिप्रेत होते.महात्मा गांधींचे न्याय व्यवस्थेबद्दलचे विचार सत्य व सामाजिक समतेवर आधारित होते. याच विचाराने विधी सेवा प्राधिकरणाचे कामकाज सुरु असून जर आपल्याकडे चांगली न्याय वितरण प्रणाली असेल तर लोकशाही मजबूत होईल जी आपल्या देशाची प्रगती करण्यास मदत करेल. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय यंत्रणांना सोबत घेऊन सर्वसामान्य घटकापर्यंत न्याय, त्यांचे हक्क व अधिकार याची जाणीव करुन दिली जात आहे.लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. आम्हाला अशा कायदेशीर सेवेबद्दल खूप आनंद आहे. समाजातील प्रत्येक घटक या उपक्रमाला साथ देतील,अशी आम्हाला आशा वाटते.“
केवळ न्यायापुरते मर्यादीत न राहता शासकीय योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, त्यांची प्रभावी अंमलबजावणी होऊन प्रजासत्ताक ही लोककल्याणकारी राज्याची संकल्पना सार्थ ठरावी, हा विधी सेवा प्राधिकरणाचा या उपक्रमाच्या आयोजनाचा उद्देश असल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी प्रास्तविकातून सांगितले. सोलापुरातील एन.ए.बी. अंधकार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले, शहर व जिल्हा पोलीस यंत्रणेतील बँन्ड पथकाने न्यायमूर्ती व मान्यवरांचे स्वागत केले.सोलापूर येथील करुणाशील समितीचे अशुतोष नाटकर आणि कलाकारांनी बालविवाह विरोधी जनजागरण व घर दोघांचे हे दोन पथनाट्य सादर केले.न्यायाधीश अश्विनी बिराजदार व न्यायाधीश वैष्णवी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रशांत पेठकर यांनी आभार मानले.
चौकट
दृष्टिक्षेपात महाशिबीर
महाशिबीरात विविध शासकीय यंत्रणांचे 40 स्टॅाल होते.
सर्व शासकीय विभागांचा सहभाग
सुमारे सहा हजार लोकांची उपस्थिती
मूळचे अक्कलकोटचे सुपूत्र असलेले न्यायमूर्ती जमादार यांनी न्यायमूर्ती पुनीवाला यांची परवानगी घेऊन मराठीमध्ये भाषण करीत असल्याचा खुलासा केल्यानंतर उपस्थितांमधून टाळ्यांची उत्फूर्द दाद
कृषी यांत्रिकीकरण, गोपीनाथराव मुंढे शेतकरी अपघात योजना, समाज कल्याण विभाग, ओ.बी.सी.महामंडळा्च्या लाभार्थींना प्रातिनीधीक स्वरुपात न्यायमूर्तींच्या हस्ते योजनेच्या लाभाचे वितरण
दोन ठिकाणी चोरीमध्ये गेलेला मुद्देमाल मूळ मालकांना न्यायमूर्ती पुनीवाला व न्यायमूर्ती जमादार यांच्या हस्ते सुफूर्द करण्यात आला.
दोन्ही न्यायमूर्तींनी सर्व 40 स्टॅालला भेटी देऊन त्या त्या विभागाच्या कामकाजाची माहिती व सामान्य जनतेशी हितगूज केले. काही स्टॅालवर त्या विभागाच्या लाभार्थिंना लाभाचे वितरणही केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रशांत पेठकर व त्यांच्या सहका-यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट व शिस्तबद्ध नियोजन केले होते.
फोटो ओळी – फोटो 1 जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने वडाळा येथे शनिवारी आयोजित केलेल्या महाशिबीरात वृद्ध महिलेची अपुलकीने विचारपूस करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार, फिरदोश पुनावाला त्यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बाबासाहेब जाधव
फोटो 2 जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने वडाळा येथे शनिवारी आयोजित केलेल्या महाशिबीरात भूमी अभिलेख खात्याच्या कामकाजाची माहिती घेताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार, फिरदोश पुनावाला,त्यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बाबासाहेब जाधव
फोटो 3 जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने वडाळा येथे शनिवारी आयोजित केलेल्या महाशिबीरात सहभागी झालेल्या विविध शासकीय विभागांच्या 40 स्टॅालचे उद्घाटन करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार, फिरदोश पुनावाला, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बाबासाहेब जाधव
फोटो 4 जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने वडाळा येथे शनिवारी आयोजित केलेल्या महाशिबीरात प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्याला मदत वाटप करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार, फिरदोश पुनावाला
























