परतुर / जालना – मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने लोणी ग्रामपंचायतीत ग्रामविकासाला गती देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामस्वच्छता करण्यासाठी गावातील सर्व नागरिक, युवक मंडळे, महिला बचत गट तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. संपूर्ण गावात रस्ते, नाले, सार्वजनिक ठिकाणे, अंगणवाडी परिसर याठिकाणी स्वच्छता करून गावाला स्वच्छतेचा नवा चेहरा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्वच्छतेनंतर ग्रामस्थांनी लोकसहभागातून गावातील महत्त्वाचा पांदण रस्ता बांधकामाचा उपक्रम हाती घेतला. या कामासाठी कुणीही शासनाकडे मदत मागण्याची वाट न पाहता स्वयंप्रेरणेने गावकऱ्यांनी एकत्र येत कामाची सुरुवात केली आणि अल्पावधीतच पांदण रस्त्याचे काम पूर्णत्वास नेले. गावकऱ्यांच्या एकीचा आणि श्रमदान संस्कृतीचा हा उत्कृष्ट नमुना ठरला आहे.
ग्रामविकासातील लोकसहभागाला बळकटी देणे, नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक करणे आणि गावातील मूलभूत सुविधांची उभारणी ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. त्यात लोणी ग्रामस्थांनी दाखविलेला उत्साह व एकजूट प्रशंसनीय असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
या सर्व उपक्रमावेळी सरपंच गजानन भैया लोणीकर, ग्रामपंचायत अधिकारी, सर्व कर्मचारी, स्वयंसेवक, महिला-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या सहभागाने राबविलेल्या या चळवळीमुळे लोणी गावाने स्वच्छता आणि विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले


















