बार्शी – क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार व शालेय खेळ महासंघ भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६९ व्या राष्ट्रीय शालेय खेळामध्ये महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या कु. सान्वी गोरे हिने घवघवीत यश संपादन केलेले आहे.
या स्पर्धा रांची (झारखंड) येथे नुकत्याच पार पडल्या.
महाराष्ट्र विद्यालयामध्ये इयत्ता ७ वी मध्ये शिकणारी कु.सान्वी दत्तात्रय गोरे या खेळाडूने बार्शीचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर उंचावलेले आहे. १४ वर्षाखालील वयोगटामध्ये महाराष्ट्र राज्यातून प्रतिनिधित्व करत असताना सान्वीने संपूर्ण देशातून आलेल्या स्पर्धकांमधून वैयक्तिक खेळामध्ये प्रथम क्रमांक मिळवत महाराष्ट्र राज्याला सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच पाचजणांच्या महाराष्ट्र राज्याच्या संघास द्वितीय क्रमांक मिळवुन दिला आहे. ही बाब महाराष्ट्र राज्याबरोबरच सोलापूर जिल्हा व बार्शी शहरातील सर्व खेळाडूंसाठी अभिमानास्पद आहे .या यशामध्ये सान्वीच्या पालकांचाही खूप मोठा वाटा आहे. सातत्याने तिला अभ्यासाबरोबरच बुद्धिबळ खेळण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. आज सान्वी ही सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरली आहे, कारण या मोबाईलच्या युगामध्ये आपण संयम राखून अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रात ही आपणास आपले नाव उंचावता येते हे तिने सिद्ध करुन दाखविले आहे.
या खेळासाठी अतुल नलगे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले तर क्रीडा शिक्षक पुष्कराज पाटील, योगेश उपळकर व विकास पाटील यांचे तिला मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल कु. सान्वी गोरे हिचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष एन.एन.जगदाळे, सचिव पी.टी.पाटील, सहसचिव देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा समितीच्या सदस्या डॉ.सौ.मिराताई यादव, विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती के.डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी.सपताळे, पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी. साठे, पर्यवेक्षक के.जी. मदने, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

















