सोलापूर – भारतीय गुणवत्ता परिषदेच्या वतीने मंगळवारी (दि.18) सरपंच संवाद ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्हिडोओ कॉन्फरद्वारे संवाद साधला. वाडकर यांना 25 हजार सरपंचांमधून संधी मिळाली असून, त्यांनी पुणे विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी सरपंच संवाद कार्यशाळेतून मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक प्रश्नांची माहिती घेऊन त्याचे निराकरण करुन सरपंच यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत महाराष्ट्रातील 25 हजार सरपंच दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यात मोजक्या सात ते आठ सरपंचांना आपल्या गावातील कार्याचा आढावा सांगण्याची संधी मिळाली. पुणे विभागात वाडकर (लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) या एकमेव सरपंचांना मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी यावेळी कासेगावच्या विकासाची यशोगाथा सांगितली. यात प्रामुख्याने सरपंच संवाद उपक्रमाच्या माध्यमातून सुरु असलेले प्रयत्न, अंतर्गत निधीच्या माध्यमातून जलसंधारण, कृषी, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण या विविध विषयांवर गावात सुरु असणारे कार्य, मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत राबवले जाणारे वैशिष्टपूर्ण उपक्रम, महिला ग्रामसभेत ठराव करून व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहकार्याने गावात केलेली दारूबंदी आदी विषयांबद्दल मुख्यमंत्र्यांना अवगत केले. त्यांच्या कार्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपस्थित होते. तर ऑनलाईन वर्षा निवास स्थानी मुख्यमंत्र्यांसह, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी, एकनाथ ढवले, जिग्नेश शाह, दिलीपसिंह बैस, श्रीकर परदेशी उपस्थित होते.


















