भोकरदनमध्ये अवैध गर्भलिंगनिदानाचा भांडाफोड : आरोग्य पथकाची कारवाई
डॉ. दिलीपसिंग राजपूत इमारतीवरून उडी मारून फरार
गर्भपाताची औषधे अन् कोट्यवधींची माया
युवराज पगारे,
भोकदरन: येथील जालना रस्त्यावरील राजूपत हॉस्पिटलच्या आलिशान इमारतीमध्ये सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्रावर शनिवारी (दि. ६) चार वाजेच्या सुमारास जिल्हा शल्यचिकित्सकांच्या जंबो पथकाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. या ठिकाणी एका महिलेचे गर्भलिंग निदान केले जात असतानाच ही कारवाई करण्यात आली. दिलीपसिंग राजपूत असे गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरचे नाव असून, तो वरच्या मजल्यावरून उडी मारून पळून गेला, दिलीपसिंग राजपूत बीएचएमएस डिग्रीधारक डॉक्टर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली. दरम्यान वैद्यकीय पथक व पोलिसांच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण इमारतीची झाडाझडती घेतली. तसेच हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. पथकाने छापा मारला त्यावेळी एक महिला गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात अॅडमिट होती. तपासणीच्या वेळी गर्भपातासाठी लागणारी इंजेक्शन्स, गोळ्या, दोन सोनोग्राफी मशीन आढळून आल्या. त्यातील एक मोबाइलसाइज अद्ययावत मशीन, तर एक पोर्टेबल मशीन आढळून आली. पथकाने कपाटात पाहणी केली असता ८ लाख ९१ हजार ७६० रुपये रोख, शभर ग्राम सोन्याच्या अंगठ्या, ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटीत फिक्स डिपॉझिट केलेल्या कोट्यवधीचा रकमेचे बॉण्ड सापडले. हॉस्पिटलमध्ये काम करणारे तीन ते चार कर्मचाऱ्यांना एक महिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचे उशिरा जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते . या छाप्यामुळे भोकरदन शहरासह तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी एकच खळबळ उडाली आहे.सदरील कारवाई जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. बी. जे. घोलप, डॉ. विजय वाकोडे, अॅड. सोनाली कांबळे, मनोज जाधव, अविनाश जाधव, संदीप रगडे या आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत दराडे, सपोनि. बालाजी वैद्य, हसनाबादचे सपोनि. संजय अहिरे, दीपक सोनवणे यांनी केली,
चौकट :-
डॉ. दिलीपसिंगच्या डिग्रीबद्दल संशय *
डॉ. दिलीपसिंग राजपूत याची डिग्रीदेखील बनावट असल्याचा वैद्यकीय पथकाला संशय असून, ती तपासण्याचे काम सुरू आहे. गर्भलिंगनिदान व गर्भपाताची परवानगी नसताना संबंधित डॉक्टरकडे सोनोग्राफीची मशीन कशी आहे, याचादेखील शोध घेणे सुरू आहे. ज्या मशीनच्या साह्याने सोनोग्राफी करायचा, ती मशीनदेखील चायनामेड आहे. दिलीपसिंग हा बीएचएमएस असून त्याचा सासरा के.एन. राजपूत हा एमबीबीएस डीजीओ आहेत. के. एन. राजपूत यांच्या मालकीचे अमर हॉस्पिटल हे या इमारतीला लागूनच आहे. मात्र, कारवाईदरम्यान के.एन. राजपूत यांच्या नावाचे व अमर हॉस्पिटलचे लेटरपॅड पथकाला सापडले असून, ते जप्त करण्यात आले आहे.
साठ चेकबुक, ४० एटीएम कार्ड •
डॉ. राजपूतच्या वरील मजल्यावरील एका रूममध्ये थैलीमध्ये लाखो रुपयांची रोकड सापडली. तसेच कपाटामध्ये ज्ञानराधा पतसंस्थेच्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेच्या मुदत ठेवीच्या पावत्या, वीस ते पंचवीस पासबुक, ५० ते ६० चेकबुक, २५ ते ३० एटीएम आणि क्रेडिट कार्ड, सोन्याच्या अंगठ्या आढळल्या शिवाय एका विशेष डायरीत कोट्यवधी रुपयांच्या कच्च्या व्यवहारांच्या नोंदी आढळून आल्या. त्यासोबतच एजंट, डॉक्टर, रुग्ण, पंथॉलॉजी चालक यांचे फोन संपर्क क्रमांक व नावे आहेत.
अनेक दिवसांपासून केंद्र रडारवर *
भोकरदन शहरातील राजपुत सोनोग्राफी केंद्रात मोठ्या प्रमाणात अवैध गर्भपात होतात यासोबत जालना, बुलडाणा, जळगाव, संभाजीनगर कन्नड सोयगाव आदी विविध शहरांतून अनेक महिला गर्भपात करण्यासाठी येत असल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात येणार असून, आतापर्यंत या केंद्रातून किती गर्भपात झाले याची माहिती स्पष्ट होणार असल्याचे डॉक्टर पाटील यांनी सांगितले,
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता प्रकार *
दरम्यान सिल्लोड येथे काही महिन्यापूर्वी अशाच प्रकारे सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्राचा भंडाफोड झाला होता. त्याचे धागेदोरे भोकरदन शहरापर्यंत पोहोचले होते. दरम्यान, डॉ. दिलीपसिंग राजपूत हा सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात कम्पाऊंडर म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने एका खासगी रुग्णालयाच्या मागे मोठी इमारत बांधून अवैधरीत्या गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्र सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या ठिकाणी असलेला कर्मचारी नवीनच भरती केलेला असल्याची माहिती समोर आली आहे.
गर्भवती महिलेला होती पहिली मुलगी *
ताब्यात घेतलेल्या गरोदर महिलेने गर्भपातासाठी आल्याचा जबाब दिला. तिला जालना येथील जिल्हा स्त्री रुग्णालhयात दाखल केले जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या महिलेस पहिली मुलगी आहे. ती एका शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी असल्याची माहिती आहे.