तभा फ्लॅश न्यूज/मुदखेड : मुदखेड तालुक्यातील सरेगाव येथील शालेय विद्यार्थ्यांनी अनेक वर्षापासून होणारी ससेहोलपट थांबली असून परिवहन मंडळाची बस गावात येताच शालेय मुलींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. त्यामूळे गेल्या दीड महिन्यापासून संदीपकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे. यावेळी ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांनी चालक व वाहक यांचे स्वागत केले. “बस आली शाळेत चला” असे म्हणत पाठीवर दप्तर घेऊन सरेगावातील मुलींनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
सरेगावातील मुलींना शिक्षणासाठी बारड येथे जावे लागते. परंतु बस गावात येत नसल्याने गावच्या शिवेपर्यंत दोन किलोमीटर जाणे आणि दोन किलोमीटर येणे असा संघर्षमय प्रवास मुलींच्या शिक्षणावर विपरीत परिणाम करणारा ठरत होता. शासन एकीकडे बेटी पढावो बेटी बचाओ या अभियानाचा गाजावाजा करत असताना मुलींच्या शाळेत शिक्षणासाठी बस नसल्याने सरेगाव मात्र यास अपवाद ठरले होते. बस नसल्याने पायपीट करण्यासाठी सकाळी सात वाजता घराबाहेर पडावे लागत असे. आणि पुन्हा सायंकाळी दोन किलोमीटरची तीच ससेहोलपट ठरलेली होती.
याबाबत नांदेड परिवहन विभागीय मंडळाचे प्रमुख चंद्रकांत वडजकर , विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश भारती यांच्याकडे प्रा. संदिपकुमार देशमुख बारडकर लेखी निवेदन देऊन शालेय विद्यार्थिनींच्या प्रवासासाठी गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार सरेगाव रस्त्याचा पाहणी अहवालही परिवहन मंडळाने तयार केला. परिवहन महामंडळाचे वाहतूक अधिकारी कमलेश भारती, आगारप्रमुख मिलिंद सोनाळे यांनी सरेगावात विद्यार्थिनींसाठी ‘निळी परी’ येणार असल्याचे संदिपकुमार देशमुख यांना सांगितले.
गावात सकाळी साडे नऊच्या सुमारास बस दाखल झाली. यावेळी शालेय मुलींनी गाडीच्या वाहक व चालक यांचा पुष्पहार देऊन सन्मान करत पेढे वाटून जल्लोष व्यक्त केला. याप्रसंगी तालुका काँगेस कमिटीचे अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर यांनी नारळ फोडून गाडीचे पूजन केले. त्यावेळी प्रा. संदीपकुमार देशमुख, सरपंच बालाजी पाटील, बाबुराव कळणे, गोपिराज कळणे पाटील, भास्कर कळणे, चक्रधर पाटील, भगवान पवार, शिवाजी गिरे, प्रशांत कळणे, पुताजी कळणे, लखन गिरे, चक्रधर कळणे, अविनाश कळणे, सटवाजी कळणे, गजानन कळणे , राम कल्याणकर आदि सह ग्रामस्थ उपस्थित होते.