अक्कलकोट – खगोलशास्त्र हे अंतराळातील ग्रह, तारे, आकाशगंगा, तेजोमेघ, धूमकेतू आणि उल्का यांसारख्या खगोलीय वस्तूंवर संशोधन करणारे, भौतिकशास्त्र व गणिताचा वापर करणारे नैसर्गिक विज्ञान आहे. हे शास्त्र विश्वाची निर्मिती, उत्क्रांती आणि त्यातील घटनांचा अभ्यास करते, ज्यातून मानवाला विश्वातील स्वतःचे स्थान समजण्यास मदत होते, असे प्रतिपादन भूगोल अभ्यासक तिरुचिरापल्ली येथील प्रा. डॉ. के. कुमारस्वामी यांनी केले.
येथील सी. बी. खेडगी महाविद्यालयात भूगोल विभागच्या वतीने आयोजित ” सर्व विद्या शाखांसाठी खगोलशास्त्रः उदयोन्मुख नवकल्पना, कल आणि शाश्वत विकास” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत डॉ. के. कुमारस्वामी बोलत होते. अध्यक्षस्थानी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी हे होते. यावेळी व्यासपीठावर कलबुर्गीचे डॉ. एम. एस. जोगद, प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले, परिषदचे सचिव डॉ. अंकुश शिंदे उपस्थित होते. डॉ. के. कुमारस्वामी यांनी उपस्थित विद्यार्थी व संशोधकांसमोर खगोलशास्त्राचा भूगोल, पर्यावरण आणि शाश्वत विकास याच्याशी असलेला आंतर विद्या शाखीय संबंध स्पष्ठ केला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. धबाले यांनी महाविद्यालय गुणवत्ता विकासाच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय परिषदांचे आयोजन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक भाषण डॉ. अंकुश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सविता वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सोमनाथ राऊत यांनी केले.
या दोन दिवसाच्या परिषदेच्या पहिल्या सत्रात डॉ. एम. एस. जोगद यांनी अंतराळ प्रवासाचा आढावा, दुसऱ्या सत्रात डॉ. जे. सी. मोरे यांनी भारतीय खगोलशास्त्रातील नक्षत्रे, तिसऱ्या सत्रात डॉ. बाबू नल्लुसामी यांनी खगोलशास्त्र आणि हवामान बदलः एक वैश्विक दृष्टीकोन, चौथ्या सत्रात डॉ. एस. एस. मस्के यांनी भूगोलातील खगोलशास्त्र शाखा अध्यापनातील आव्हाने, पाचव्या सत्रात डॉ. विकास नागरे यांनी भूगोलाच्या अध्यापनातील खगोलशास्त्राचे महत्त्व, सहाव्या सत्रात डॉ. किसन झिपरे यांनी विद्युत्-चुंबकीय वर्णपटाद्वारे ब्रह्मांडशास्त्राचा अभ्यास या विषयावर उद्बोधन केले. सातव्या सत्रात संशोधक विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्र विषयावर आधारित संशोधन पत्रिकाचे प्रस्तुतीकरण झाले, आणि डॉ. नल्लासॅमी, डॉ. दीपक देडे, डॉ. खडके यांनी परीक्षकांचे काम पहिले.
या राष्ट्रीय परिषदेस तामिळनाडू, पश्चिम बंगाल,कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मराठवाडा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर या प्रांतातून अनेक भूगोल, पदार्थविज्ञान, सामाजिक शास्त्र, मानव विद्याशाखा विषयाच्या अनेक विषयतज्ञ, अभ्यासक, संशोधकांनी उपस्थिती लावली. या परिषदेस एकूण ४० संशोधन पेपर प्राप्त झाले.
समारोपप्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव सुभाष धरणे, प्राचार्य डॉ. टी. एन मगर, विशेष उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले, उमदी महाविद्यालयाचे मुख्य प्रशासक म्हणून डॉ. एस. सी. अडवितोट, मुख्य परिषद संचालन सचिव डॉ. अंकुश शिंदे उपस्थित होते. प्राचार्य डॉ.टी. एनमगर यांनी खगोलशास्त्र आणि भूगोल यांचा सहसंबंध विषया महत्व व फायदे सांगितले. कार्यक्रमाचे अहवाल वाचन डॉ. भैरप्पा कोणदे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. अंकुश शिंदे आणि सूत्रसंचालन डॉ. लता हिंडोळे यांनी केले.
परिषद यशस्वी करण्यासाठी भूगोल विभाग, सयुंक्त आयोजक प्रा. अभिजीत धोत्रे, प्रा. लक्ष्मण ढाले, प्रा.पवन हरदास, प्रा. व्ही. बी. माकणे, प्रा. प्रा. महेश पाटील, प्रा. आदिलशहा शेख, प्रा. नागेश विजापूरे व विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, आदींनी परिश्रम घेतले.
सदरच्या परिषदेतर्फे खगोलशास्त्र विषयावर आयोजित संशोधन पेपर वाचनमध्ये प्रा. सविता वाघमारे ( प्रथम), डॉ. सोमनाथ राऊत ( व्दितीय) व डॉ. बाळू पवार ( तृतीय) क्रमांक मिळविला.























