मुदखेड – येथील रहिवासी आणि सोनार कारागीर स्व.संतोष टाक यांचा १६ डिसेंबर २०२५ रोजी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परखाली दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे मुदखेड परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या कठीण प्रसंगी टाक कुटुंबाला आर्थिक आणि मानसिक आधार देण्यासाठी त्यांच्या शालेय मित्रपरिवाराने मदतीचा हात पुढे केला आहे.
महात्मा गांधी विद्यालय, मुदखेड येथील १९८६ च्या १० वी बॅचमधील वर्गमित्रांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी जपली आहे. आपल्या दिवंगत मित्राच्या कुटुंबाला सावरण्यासाठी या मित्रपरिवाराने ५१,००० हजार रुपयांचा मदत निधी गोळा करून टाक कुटुंबाकडे सुपूर्द केला.
या उपक्रमात समाजसेवक तथा माजी नगरसेवक कैलास विश्वनाथराव गोडसे, किशोर शेवाळे, धनंजय मामीडवार, निळकंठ पेडोळे, सुभाष चौदंते, संजय वटमवार, श्रीकृष्ण देशमुख आणि लक्ष्मणराव शहाने यांच्यासह १९८६ बॅचच्या सर्व मित्रांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
या मदतीमुळे टाक कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून, शालेय मित्रांनी जपलेल्या या मैत्रीचे आणि संवेदनशीलतेचे शहरात कौतुक होत आहे.

























