सोलापूर : वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे आयोजित अकराव्या वधू-वर परिचय मेळाव्याच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा रविवारी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी कार्यालय, सिद्धेश्वर मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी नूतन महापौर विनायक कोंड्याल यांनी “स्व. महेश अण्णा कोठे यांचे वीरशैव सांस्कृतिक कन्नड भवन उभारण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महापौर कोंड्याल यांच्या हस्ते वधू-वर परिचय पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर बमनी, सचिव नीलकंठ कोनापुरे, विश्वस्त विश्वनाथ लब्बा, बाळासाहेब भोगडे, प्रभुराज मैंदर्गी, रतन रिक्के, प्रकाश बिराजदार तसेच नगरसेवक राजशेखर पाटील, सुधीर खरटमल, सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, सुदीप चाकोते, डॉ. प्रकाश घटूळे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी (जगद्गुरु, काशी पीठ जंगमवाडी) यांनी शुभाशीर्वाद देत प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
यावेळी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी व वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे महापौर कोंड्याल यांचा शाल, हार व ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापूरे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गुरुनाथ निंबाळे यांनी केले तर आभार शशिकांत बिराजदार यांनी मानले.

























