सोलापूर : महापालिकेच्या वेबसाईटवर आता सेवा हमी कायदा डॅशबोर्ड सुरू करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवता येईल. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे नेमकी किती प्रकरणे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. एखाद्या प्रकरणातील अर्ज नामंजूर झाला, अपील करणे, अपिलांची सुनावणी, निर्णय हे वेबसाइटवर पाहता येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा
हक्क अधिनियमानुसार नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांचा कालावधी निश्चित केला आहे. त्यानुसार महापालिका सध्या एकूण १४४ सेवा ऑनलाइन स्वरूपात देत आहे. यामध्ये जन्म-मृत्यू दाखला, विविध व्यवसायांचे परवाने, नळ जोडणीचा अर्ज, झाडाच्या फांद्या तोडणे, सेफ्टी टैंक स्वच्छता, अग्निशामक दलाकडील सेवा , नाहरकत प्रमाणपत्रे यासह एकूण १४४ ऑनलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या ऑनलाइन सेवांचा आढावा घेतला जातो. यात कर्मचारीनिहाय प्रलंबित प्रकरणे सर्व नागरिकांना दिसत आहेत. सर्व प्रकरणे विहित मुदतीत निकाली काढावीत. यासाठी हा डॅशबोर्ड उपयोगी पडणार आहे.
दरम्यान, या वेबसाईटवर सेवा हमी कायदा डॅशबोर्ड सुरू करण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांची नावे, कुणाकडे किती प्रकरणे प्रलंबित आहेत याची माहिती नागरिकांना पाहता येणार आहे. या कामावर आयुक्त कार्यालयाचे लक्ष आहे. सेवा कायद्यानुसार वेळेत प्रकरणे निकाली काढली नाहीत तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दर दिवसाला १०० रुपयांचा दंड केला जात आहे. त्यामुळे प्रकरणे वेळेवर निघतील. ज्यांच्याकडे सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित आहेत त्यांच्याबद्दल तक्रार करता येणार आहे. अपील आणि द्वितीय सेवा अपील या पर्यायाखाली सुविधा उपलब्ध आहे. अपील करताना नागरिकांसाठी पीडीएफची सोय आणि एसएमएसद्वारे सुनावणीची तारीख कळविली जाणार आहे.
असा पाहता येणार ऑनलाईन सेवा डॅशबोर्ड
डॅशबोर्डच्या डाव्या बाजूला सेवांची मुख्य वर्गवारी व त्या वर्गवारीमधे येणाऱ्या सेवा नमूद केलेल्या आहेत. सेवांच्या मुख्य वर्गवारीवर क्लिक केल्यानंतर त्या मुख्य वर्गवारीमधे दिल्या जाणाऱ्या सेवांची यादी पहावयास मिळेल.
या यादीमधील सारांश अहवालावर क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूस त्या वर्गवारीतील सर्व सेवांची तपशीलवार आकडेवारी पहावयास मिळेल. जसे की एकूण किती अर्ज प्राप्त, किती प्रलंबित, किती पूर्ण झाले इत्यादी.
प्रलंबित (विहित वेळेनंतर) आकडेवारीवर क्लिक केलेस कर्मचारीनिहाय प्रलंबित अर्जाची संख्या पहावयास मिळेल
या संख्येवर क्लिक केल्यास नेमके कोणते अर्ज प्रलंबित आहेत याची सविस्तर यादी पहावयास मिळेल. डाव्या बाजूला सेवांच्या मुख्य वर्गवारीवर क्लिक केल्यास त्या वर्गवारीमधे येणाऱ्या सर्व सेवांची यादी पहावयास मिळेल या सेवांच्या नांवावर क्लिक केल्यास व्युव (Grpahical View) मध्ये आकडेवारी पहावयास मिळेल, असे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.


















