सोलापूर – सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असून नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि रक्तदाते बाहेर गेल्याने स्वेच्छा रक्तदान आणि रक्तदान शिबिरे यामध्ये घट झाली असून शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी झाला आहे. थॅलेसेमियाग्रस्त बालके, डायलिसीस आणि कर्करोग ग्रस्त रुग्ण यांना नियमितपणे रक्त व रक्तघटकांची गरज असते तसेच डेंगीसदृष्य आजाराचे वाढते रुग्ण यामुळे रक्ताची मागणी वाढली आहे. अशी आणीबाणीची परीस्थिती असल्याने रक्तदात्यांनी पुढे येऊन मदत करावी.
दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी शहरातील नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि रक्तदाते शहराबाहेर गेले असून, गेल्या पंधरवड्यापासून शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान शिबिरांअभावी मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. एखाद दुसरादिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध असल्याने तुटवडा वाढण्याची भिती आहे.
’मागणीच्या तुलनेत रक्ताचा पुरवठा कमी पडू लागला आहे. सध्या आमच्याकडे सध्या ८० ते ९० पिशव्या रक्त असून, पुढील एक-दोन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. त्यानंतर गरज भासल्यास रक्त उपलब्ध करणे अशक्य आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी रक्तदान शिबिरे होणे आवश्यक आहेत. दिवाळीच्या सुट्टीमुळे नोकरदार वर्ग, विद्यार्थी शहराबाहेर गेल्याने रक्तदान शिबिरे झाली नाहीत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.’ – श्री. सतिश मालु, अध्यक्ष डॉ. हेडगेवार रक्तपेढी
सुट्ट्यांमध्ये गुडघा, यकृत प्रत्यारोपण, हृदय शस्त्रक्रिया यांसारख्या पूर्वनियोजीत शस्त्रक्रियांचे नियोजन केले जाते. त्यामुळे रक्ताची गरज अचानक वाढते. परंतु सुट्ट्यांमुळे रक्तदाते उपलब्ध नसतात परिणामी आवश्यक रक्तघटक रुग्णांना मिळत नाहीत.
गेल्या काही वर्षांत शहरात मोठ-मोठी सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल्सची संख्या वाढली आहे. मुंबई-पुण्यापेक्षा स्वस्त परंतु तुलनात्मकदृष्ट्या दर्जेदार रुग्णसेवा मिळत असल्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील मेडिकल हब म्हणून सोलापूर शहर प्रसिध्द होत आहे. यामुळे वाढलेली रुग्णसंख्या, प्रदूषण, कर्करोगामुळे वाढलेली रक्ताची गरज या कारणांमुळे रक्ताचा वापर वाढला आहे.
‘रक्तदात्यांनी पुढे यावे’
स्वेच्छा रक्तदाते आणि रक्तदान शिबिर संयोजक संस्थांनी पुढे येऊन रक्तपेढ्यांना सहकार्य केल्यास, गरजु रुग्णांना रक्तपुरवठा करणे शक्य होईल. तरी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष श्री. सतिश मालु यांनी केले आहे.


















