भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार, मनसेचा समावेश महायुती होणार अशा चर्चांना अचानक ब्रेक लागला. मनसेप्रमुख राज ठाकरे दोन आठवड्यांपूर्वी अमित ठाकरेंसह दिल्लीला जाऊन आले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहांची भेट घेतली. यानंतर ठाकरे मुंबईत परतले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. पण त्यानंतर मनसे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा एकाएकी थांबल्या.
राज ठाकरे आणि अमित शहांची बैठक सकारात्मक झाल्याचं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं. पण भाजप-मनसेनं अद्याप तरी युती जाहीर केलेली नाही. सध्याच्या घडीला महायुतीत तीन पक्ष आहेत. त्यांच्यात जागावाटपावरुन बरीच रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे नवी युती करण्यापूर्वी भाजपनं आस्तेकदम धोरण स्वीकारलं आहे. आधी जागावाटप निकाली लावू आणि मग मनसेसोबत युतीचा निर्णय घेऊ, असा पवित्रा भाजपनं घेतला आहे.
भाजपमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेनं सुरुवातीला लोकसभेच्या दोन जागांची मागणी केली होती. दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागेसाठी मनसे आग्रही आहे. पण शिर्डीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचा उमेदवार घोषित केला आहे. तर दक्षिण मुंबईच्या जागेसाठी भाजप, शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. या वाटाघाटी पूर्ण झाल्याशिवाय भाजप मनसेसोबत युती जाहीर करण्यास उत्सुक नाही. युतीची चर्चा थांबल्यानं दोन्ही पक्षांमधील नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
राज ठाकरे दिल्लीला जाण्यापूर्वी त्यांच्या देवेंद्र फडणवीसांसोबत बैठका झाल्या. पण आता अचानक हा विषय थंड बस्त्यात गेला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांबद्दल भाजपनं अतिशय पटकन निर्णय घेतला. शरद पवारांच्या भेटीला गेलेल्या, त्यांच्यासोबत माढ्यासाठी बोलणी करणाऱ्या जानकरांना महायुतीत राखण्यात भाजपला यश मिळालं. त्यांच्यासाठी महायुतीनं परभणीची जागा सोडली.