सांगोला – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष व दिपकआबा साळुंखे पाटील गट हे एकत्रित लढवणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी मंगळवार दि.२० जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले, शेतकरी कामगार पक्ष व दिपकआबा साळुंखे पाटील यांची स्व.आ. गणपतरावजी देशमुख यांच्यापासून चालू असलेली परंपरागत ही आघाडी कायम राहणार असून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदसाठी ७ पैकी शेकाप ४ तर दिपकआबा साळुंखे पाटील गट ३ जिल्हा परिषद गट लढवणार आहेत. यावेळी माजी आ. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सांगोला तालुका विकास आघाडी स्थापन करण्यात आली असून त्याचे अधिकृत रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. तसेच पंचायत समिती साठी शेतकरी कामगार पक्ष ९ तर दिपकआबा साळुंखे पाटील गट ५ ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. यावेळी शेतकरी कामगार पक्ष व दिपकआबा साळुंखे पाटील गटाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

























