सोलापूर – निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेचे सहशिक्षक शितलकुमार पाटील यांना सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
करमाळा येथील राजयोग सभागृहात आयोजित कार्यक्रमात माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, जिल्हा परिषद सदस्या रश्मी बागल, विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष संजय जवंजाळ, राज्य संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते, सचिव डॉ.नूर अहमद कारंजे यांच्या हस्ते शितलकुमार पाटील यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पाटील हे नेताजी शिक्षण संस्थेत गेल्या वीस वर्षांपासून विज्ञान विषयाचे अध्यापन करीत असून पाच वेळा तालुका, सात वेळा जिल्हा, तीन वेळा राज्य , एक वेळा राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात यश प्राप्त केले आहेत.राष्ट्रीय विज्ञान बालनाट्य स्पर्धेत सहभाग घेऊन तृतीय क्रमांक पटकाविले आहे.विज्ञान विषय अध्यापनात दाखविलेली निष्ठा, प्रयोगशीलता वृत्तीमुळे, विद्यार्थ्यांच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोन, जिज्ञासा आणि संशोधन वृत्ती निर्माण केल्यामुळे , विज्ञान विषयीची आवड निर्माण करण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण उल्लेखनीय प्रयत्नांमुळे, विज्ञान प्रदर्शन, प्रकल्प स्पर्धा, नवोपक्रम उपक्रम तसेच समाजाभिमुख वैज्ञानिक जनजागृती कार्यक्रमांमध्ये दिलेले योगदान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याने ,त्यांच्या कार्यामुळे आपल्या विद्यालयाचे तसेच जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल पाटील यांना आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे जिल्हा अध्यक्ष संजय जवंजाळ यांनी सांगितले.
यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले.

























