नांदेड / देगलूर : तालुक्यातील सुंडगी (बु.) गावातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून साकारलेल्या शिव पांदन रस्त्याचे माती काम पूर्ण झाले असून आता या रस्त्याचे खडीकरण करण्याची मागणी प्रशासनाकडे जोर धरू लागली आहे. सुंडगी (बु.) गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार, देगलूर यांना या संदर्भात निवेदन दिले असून ग्रामपंचायतीनेही ठरावाद्वारे या मागणीला मान्यता दिली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मौ. सुंडगी (बु.) येथील पांडूरंग लालु कांबळे ते पांडूरंग चंद्रप्पा पाटील यांच्या शेतीपर्यंत जाणारा हा रस्ता सुमारे दोन किलोमीटर लांबीचा असून शेतकऱ्यांचा दळणवळणाचा हा मुख्य मार्ग आहे. या रस्त्याने शेतातील माल, बियाणे व खत वाहतूक केली जाते. मात्र पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होऊन वाहतूक पुर्णपणे ठप्प होते, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

गावकऱ्यांनी स्वतःच्या श्रमदानातून आणि लोकसहभागातून या रस्त्याचे माती काम पूर्ण केले आहे. आता शासनाने किंवा प्रशासनाने पुढाकार घेऊन या रस्त्याचे खडीकरण करावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. प्रशासनानेही तातडीने या मागणीवर लक्ष घालून रस्त्याचे खडीकरण केल्यास गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर दिगांबर हणमंतराव पाटील (भारतीय जनता पार्टी बुथ प्रमुख), विजय पाशमवार, शंकरराव पाटील, बाळासाहेब पाटील, कपिल देशमुख, लक्ष्मण बरसमवार, दिलीप पाटील, युवराज कांबळे (पोलीस पाटील), हणमंतराव बडगे, हणमंतराव तोटावाड, सुभाषराव बोईनवाड, मारोती बडेवार, शेषेराव चिंतलवाड, सुरेश देशमुख हवरगेकर, गंगाधर बरसमवार, शंकर बरसमवार आदीं शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, निवेदनाच्या प्रती जिल्हा दंडाधिकारी नांदेड, उपजिल्हाधिकारी देगलूर, देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आ. जितेश अंतापूरकर यांनाही देण्यात आले आहेत.




















