जिंतूर / परभणी – जिंतूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. शिवसेना (शिंदे गट)तर्फे राजेश वट्टमवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात अधिकृत प्रवेश केला आहे.
उमेदवारी दाखल करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, शिवसेना (शिंदे गट)चे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी स्वतः हजर राहून वट्टमवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला. त्यांच्या उपस्थितीमुळे उमेदवाराला मिळालेल्या समर्थनाचे राजकीय वर्तुळात महत्त्वपूर्ण संकेत मानले जात आहेत.
अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान पक्षाच्या घोषणा, समर्थकांच्या उत्साहाने परिसर दणाणून गेला. राजेश वट्टमवार यांनी नगरपरिषदेत पारदर्शक कारभार, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुधारित व्यवस्था, रस्त्यांचे मजबुतीकरण आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त योजना राबविण्याचे आश्वासन व्यक्त केले.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून अधिकृत दिशादर्शन मिळाल्याने या उमेदवारीमुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा राजकीय कलाटणी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), भाजप आणि काँग्रेस या पक्षांकडून उमेदवारांची नोंद झाल्याने जिंतूरमधील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आणखी स्पष्ट झाली आहेत.
अंतिम उमेदवारांची छाननी आणि त्यानंतर समितीने जाहीर होणाऱ्या वैध उमेदवारी यादीकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे.


















