पंढरपूर – शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सांगोला, पंढरपूर व मंगळवेढा या शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख पंढरपूर विभागासाठी संभाजी शिंदे यांची पुनःश्च निवड करण्यात आली आहे.
शिवसेना पक्ष विभागणीनंतर अनेक ठिकाणी पक्ष संघटना विस्कळीत झाली आहे. असे असताना, जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांनी मात्र ठाकरे घराण्याशी आपली निष्ठा कायम ठेवली. विरोधी पक्षांकडून आलेल्या विविध ऑफर आणि आमिषांना धुडकावून लावत त्यांनी पक्षाशी असलेली बांधिलकी ढळू दिली नाही. सोलापूर जिल्ह्यात अनेक भागांत पक्षाची धुरा एकाकीपणे सांभाळत त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे काम केले. कठीण काळातही पक्षाशी प्रामाणिक राहून संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे.
दरम्यान संभाजी शिंदे यांच्या पुनर्नियुक्तीमुळे सांगोला, पंढरपूर आणि मंगळवेढा भागातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
——————
मंदिर समितीचे सदस्य म्हणून देखील कार्यरत
संभाजी शिंदे यांनी जिल्हाप्रमुखपदाची धुरा सांभाळत असताना तीन टर्म पंचायत समिती सदस्यपद भूषविले आहे. तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमध्ये सदस्य म्हणून देखील सध्या ते काम पाहत आहेत.

























