बार्शी – बार्शी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी बारबोले–सोपल गटाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठा निर्णय घेतला आहे. निर्मला विश्वास बारबोले यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या तिकिटावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे त्यांच्या पती विश्वास बारबोले हे मुळचे राष्ट्रवादीचे नेते असून यावेळी संपूर्ण बारबोले परिवार व गटाने एकत्रितपणे महाविकास आघाडीबरोबर उभे राहत हा निर्णय घेतला आहे.
अर्ज दाखल करताना माजी उपनगराध्यक्ष अरुणा परांजपे, भारती बगले, राणी शेळके, गोदावरी शिंदे, वैशाली सावळे आणि विक्रमसिंह पवार उपस्थित होते. महिलांची भक्कम उपस्थिती आणि बारबोले घराण्याची एकजूट या सोहळ्यातून स्पष्ट दिसून आली.
या उमेदवारीमुळे बार्शीच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली असून आगामी निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.


















