पंढरपूर : “छत्रपती शिवाजी महाराजांसारखा लोकाभिमुख राजा इतिहासात झाला नाही आणि भविष्यात होणे कठीण आहे. जाणता राजा, रयतेचा राजा, धर्मसहिष्णू राजा अशा उपाध्यांतून त्यांच्या कार्याची महानता अधोरेखित होते. सतराव्या शतकात इस्लामी सत्तेच्या प्राबल्याच्या काळात जनतेवर होणारा अन्याय, अत्याचार व शोषण दूर करण्यासाठी त्यांनी स्वराज्याचे व्रत स्वीकारले. राजा हा प्रजेचा मालक नसून सेवक असतो, ही भूमिका स्वीकारून महाराजांनी जनतेची आयुष्यभर सेवा करण्याचा ध्यास घेतला.” असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. विकास कदम यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, इतिहास विभाग व समारंभ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती’ या विषयावर प्रा. डॉ. विकास कदम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव हे होते.
डॉ. विकास कदम पुढे म्हणाले की, “महाराजांनी व्यक्तिगत व राजकीय जीवनात डामडौल न करता न्यायनिष्ठा व सेवाभाव जोपासला. स्वराज्यनिष्ठ मावळे व रयत घडवून युवकांमध्ये धाडस, दूरदृष्टी व प्रेरणा निर्माण केली. नवीन प्रदेश जिंकताना तेथील जनतेचा विश्वास संपादन करून सामाजिक समता व कर्तृत्वाला महत्त्व दिले. धर्मगुरू व फकीरांचा आदर करून समाजाची नैतिकता व वैचारिक अधिष्ठान उंचावले. चुकीच्या रूढी-परंपरांना आळा घालण्यासाठी त्यांनी कृतीतून आदर्श घालून दिला. शहाजीराजांच्या निधनानंतर सती जाणाऱ्या जिजाऊंना रोखणे, स्त्रियांचा सन्मान राखणे, निष्कलंक चारित्र्य राखणे ही त्यांची वैशिष्ट्ये होती. मराठ्यांना आपलेसे करण्यासाठी आठ विवाह केले; मात्र इतर राजांसारखा जनानखाना ठेवला नाही. धर्माचा वापर प्रतिष्ठा वाढवण्यासाठी किंवा छळासाठी न करता त्यांनी धर्मसहिष्णुतेची भूमिका स्वीकारली. मुठभर मावळ्यांच्या बळावर बलाढ्य इस्लामी सत्तांना शह देत जनतेच्या विश्वासावर आधारित वैचारिक बैठक निर्माण केली”.
(शिवजयंती प्रेरणादायी उत्सव — डॉ. बी. टी. जाधव)
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव म्हणाले की, “शिवजयंती हा प्रेरणा देणारा उत्सव असून देशात व विदेशात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या निमित्ताने अभ्यासू व्यक्तींची व्याख्याने आयोजित करून ऐतिहासिक दस्तऐवज व पुराव्यांच्या आधारे सत्य इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासातून वर्तमानासाठी धडे घेऊन भविष्यात त्याचा उपयोग करणे गरजेचे असून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुण आत्मसात करून स्वतःचे व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे”.
कार्यक्रमास कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. राजेश कवडे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य तथा अधिष्ठाता डॉ. सुशीलकुमार शिंदे, अधिष्ठाता समाधान माने, पदवीधर पदवी वर्गाचे अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी व इतिहास विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय चौधरी यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. भारती सुडके यांनी केले. या कार्यक्रमास सीनियर, ज्युनियर व व्होकेशनल विभागातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी समारंभ समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी आभार मानले.


























