इन्स्टाग्रामवरुन ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करत तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती करणाऱ्या युवकाला पारडी पोलिसांनी अटक केली. शिवम शेषराम मेहरा (वय १९, रा. एकतानगर, भांडेवाडी) असे अटकेतील युवकाचे नाव आहे. ही १५वर्षीय मुलगी दहाव्या वर्गात शिकते. शिवम हा फर्निचरचे काम करतो. ऑक्टोबर २०२३मध्ये शिवमची पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मुलीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाच्या आणाभाका झाला. दोघांत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.
दरम्यान, मुलीची प्रकृती खालावली. नातेवाइकांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नातेवाइकांना धक्का बसला. नातेवाइकांनी चौकशी केली. शिवमसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तिने नातेवाइकांना सांगितले. मुलीच्या एका नातेवाइकाने पारडी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शिवमला अटक केली. पोलिसांनी शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.