नरखेड – मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे यात्रा व महाशिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांनी हर हर महादेवाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी करण्यात आली.मलिकपेठ येथील श्री शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त पालखीची व मानाच्या काटीची सवाद्यासह मिरवणूक काढून मोठ्या उत्साही वातावरणामध्ये यात्रा सोहळा संपन्न झाला.
मलिकपेठ येथे श्री शंभू महादेवाच्या महाशिवरात्रीनिमित्त शनिवारी चार वाजता सीना व भोगावती नदी संगमवरून कावडीचे जलपूजन करून गावातून वाजत गाजत मिरवणुकीसह श्री शंभू महादेव मंदिरामध्ये आणण्यात आले. मंदिरामध्ये दैनंदिन नित्य नियमाची शिवलिंग पूजा व आरती, मोहोळ वैराग रोडवरील मोबाईल टॉवर पासून काटी पताका मिरवणुकीसह मंदिरामध्ये आगमन झाले.रविवारी पहाटे पाच ते सहा या वेळेत मानकरांच्या हस्ते शिवलिंगाची व नंदीची विधिवत पूजा , सहा ते सात मूर्तीस व शिवलिंगास दुग्धाभिषेक , मंदिरामध्ये रुद्राभिषेक व रुद्र पठण कार्यक्रम शिवभक्त पारायण गौरीशंकर नागनाथ स्वामी संन्यासी मठ देगाव यांचा रुद्र पटन कार्यक्रम पार पडला.
सकाळी श्री देवाच्या मूर्ती व पादुका पालखीमध्ये विराजमान करून पालखीची व शेरणी प्रसाद काठी पताकासह वाजत गाजत गावातील मुख्य रस्त्यावरून नगरप्रदक्षिणेसह टाळ मृदंगाच्या गजरात, बँड, डॉल्बीच्या तालावर मिरवणूक बाहुल्याच्या सोंगाड्याची काढण्यात आली.दुपारी मंदिरामध्ये महाआरती कार्यक्रम शिवभक्त पारायण, शिवयोगी श्री १०८ गुरुदेव शिवाचार्य माडेकर महाराज यांचे शिव प्रवचन,रात्री शिवलीलामृत ग्रंथाचे महादेव मंदिरामध्ये सामूहिक वाचन करण्यात आले. ह भ प कुमारी पायलीताई कुंजीर उरळी कांचन यांच्या काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाने यात्रेची सांगता करण्यात आली. यात्रा शांततेत व भक्तीमय वातावरणात पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.






















