सांगोला -श्री समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा ११२ वा पुण्यतिथी उत्सव श्रीराम व ध्यान मंदिर, सांगोला येथे दि .५ ते १४ डिसेंबर दरम्यान साजरा केला. यानिमित्त भीक्षा, भजन, मौन, गायन, कीर्तन, प्रवचन, उपासना, अखंड १३ तासाचा जप, लहान मुलांच्या पाठांतर स्पर्धा असे कार्यक्रम पार पडले.
दररोज स.६.३० वा.काकडा व सामुदायिक जप राममंदिर येथे संपन्न झाला. हभप.अर्चित वैभव साने, कोरेगाव, सातारा याचे नारदीय कीर्तन, समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांचे समर्थ रामदास स्वामी यांचे जीवन कार्य या विषयावर दोन दिवस प्रवचन, हभप.डाॅ.जयवंत महाराज बोधले यांचे नामस्मरण व अभ्यास या विषयावर तीन दिवस प्रवचन, दयानंद बनकर व त्यांचे सहकारी यांचा भजन संध्या हा भावगीत, भक्तीगीत, अभंग, बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.
रविवारी हभप.शुभांगी कवठेकर यांचे पुण्यतिथी कीर्तन व श्री महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. शुभांगी कवठेकर यांना तबल्याची साथ दत्तात्रय बोत्रे यांनी तर हार्मोनियम साथ शशिकांत लाटणे यांनी केली. सूत्रसंचालन अश्विनी कुलकर्णी यांनी केले. यानंतर श्रीमहारांजांची पालखी व नगर प्रदक्षिणा शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. दुपारी ध्यान मंदिरात आरती व महाप्रसाद होऊन उत्सवाची सांगता झाली.


























