पंढरपूर – सोलापूर जिल्हातील ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी (ता.पंढरपूर) येथे मंगळवार पासून पुण्यतिथी सोहळ्याचे नाम सप्ताह सुरू झाला आहे. येत्या दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सद्गुरु श्री सिताराम महाराज पुण्यतिथी सोहळ्या निमित्त महाराजांच्या समाधीवर पुप्षवृष्टी केली जाणार आहे.
या नाम सप्ताहामध्ये सकाळी काकडाआरती, भजन, दुपारी आरती, महानैवेद्य असे स्वरूप असते.सायंकाळी सहा पासून रात्री दहा पर्यंत कीर्तन, प्रवचन, महाआरती असते. नाम सप्ताहासाठी हजारो भाविक श्री सिताराम महाराजांच्या मठामध्ये व गावांमध्ये अन्यत्र रहात असल्याने गावाला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरम्यान समाधी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त हरी पांडुरंग कुलकर्णी अध्यक्ष दीपक रोंगे, भागवत ( बापू) केसकर,विकास (वामन)कुलकर्णी, उमेश परिचारक विश्वस्तांसह आदींनी यात्रा पूर्व बैठक घेऊन नियोजन केले आहे. गावचे सरपंच मनीषा सव्वाशे,उपसरपंच शरद रोंगे, ग्रामसेवक बी.व्ही. कुलकर्णी, बंडुलाल पठाण, अण्णा कावरे, प्रभू गायकवाड, हुसेन मुलाणी, आदी परिश्रम घेत आहेत.
——————–
यात्रेसाठी पोलिस बंदोबस्तासह विशेष गाड्यांची सोय –
यात्रा कालावधीसाठी विशेष गाड्यांची सोय पंढरपूर व सांगोला येथून केली असल्याची माहिती आगारप्रमुखांनी दिली. तसेच यात्रा कालावधीत चोख बंदोबस्त ठेवणार असल्याची माहिती तालुकापोलीस निरीक्षक टी.आय.मुजावर, पोलीस पाटील बालाजी रोंगे यांनी दिली.
——————–
१७ नोव्हेंबर रोजी समाधीवर पुष्पवृष्टी –
येत्या १७ नोव्हेंबर रोजी महाराजांच्या समाधीवर बारा वाजून वीस मिनिटांनी पुष्प वर्ष करण्यात येणार आहे.
——————–
यात्रेचा उत्सव चार दिवस चालणार –
यंदाचा उत्सव हा अमावस्या व गुरुवारसह चार दिवस चालणार असल्याने गावात खेळण्याची दुकाने थाटली गेली आहेत. त्यामुळे बाळगोपाळांना आनंद घेता येणार आहे.
——————–
४ डिसेंबरला गाणपुरात पालखी –
खर्डी येथील यात्रेत आजूबाजूच्या परराज्यातून देखील हजारो भाविक येत असतात. मंदिरावर आकर्षक रोषणाई केली आहे. दिनांक २१ नोव्हेंबर रोजी पालखी प्रस्थान होऊन ४ डिसेंबर रोजी गाणगापूर येथे पोहोचणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख विकास कुलकर्णी यांनी दिली.















