पंढरपूर – मंदिर प्रीमिअर लीग टेनिस बॉल (दिवस/रात्र) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत शास्त्री नगर मैदान, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. सदर स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात एकूण १२ संघांनी सहभाग नोंदविला असून, यामध्ये यंदा प्रथमच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर येथील आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी व पुजारी यांचा संघ सहभागी होत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या संघाचा स्वेरी कॉलेजच्या मैदानावर नियमित सराव सुरू असून, या संघातील खेळाडूंना मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते जर्सी (टी-शर्ट), बूट व इतर क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पारंपरिक धोतर व नेहरू शर्ट परिधान करून मैदानावर उतरून बॉलिंग व फलंदाजी करत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांच्या या सहभागामुळे उपस्थित खेळाडू व क्रीडाप्रेमींमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मंदिर प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेला क्रीडाप्रेमींकडून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विविध धार्मिक व सामाजिक संस्थांचे संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यामध्ये श्री क्षेत्र जोतिबा, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, श्री क्षेत्र अंबाबाई (महालक्ष्मी), ओढ्यावरील गणपती (प. म. दे. स.), परशुराम सोशल फाउंडेशन, श्री क्षेत्र तुळजापूर, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र माहूरगड, श्री क्षेत्र गहिनीनाथ (औसा), श्री क्षेत्र शिर्डी तसेच श्री महालक्ष्मी (सारसबाग, पुणे) आदी संघांचा समावेश आहे.
मंदिर प्रीमिअर लीग टेनिस बॉल क्रिकेट समितीने स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या आकृतीबंधानुसार एका संघामध्ये जास्तीत जास्त १४ खेळाडू असणे बंधनकारक असून, परगावातून येणाऱ्या संघांच्या खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था स्पर्धा समितीतर्फे करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक संघाने सामना सुरू होण्यापूर्वी किमान ४० मिनिटे आधी मैदानावर उपस्थित राहणे बंधनकारक राहील, असे नियम व अटी घालण्यात आले आहेत.
————-
कोट
मंदिर प्रीमिअर लीगमध्ये यंदा प्रथमच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे पुजारी, अधिकारी व कर्मचारी सहभागी होत आहेत. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या लौकिकाप्रमाणेच आमचे खेळाडू उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवतील, अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो.
– गहिनीनाथ महाराज औसेकर
सह-अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर
———
फोटो कॅप्शन
पंढरपूर : स्वेरी कॉलेजच्या मैदानावर मंदिर प्रीमिअर लीगसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंना टी-शर्ट व क्रीडा साहित्याचे वाटप करताना सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, स्वेरी कॉलेजचे सचिव डॉ. सुरज रोंगे, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार आदी.

























