मुदखेड / नांदेड – पुणे येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा श्यामची आई हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मुदखेड येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा साहित्यिक विजयकुमार बेंबडे आणि त्यांच्या मातोश्री शारदाबाई धोंडीराम बेंबडे यांना जाहीर झाला आहे.
शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. साने गुरुजी यांनी आपल्या आईची सेवा करून आपले नाव अजरामर केले. बेंबडे हे नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी राहात असले तरी आपल्या आईच्या सेवेत त्यांनी कसलीही कमतरता पडू दिली नाही. आपला जास्तीत जास्त वेळ ते आईच्या सेवेसाठी देतात. त्यांच्या या कार्याची नोंद प्रतिष्ठानने घेतली आहे.
प्रसिध्द रानकवी तथा गिरगाव येथील हु.बहिर्जी स्मारक विद्यालयाचे शिक्षक श्रीनिवास मस्के यांना साने गुरुजी विचार साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शाल, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. साने गुरुजी शिक्षक प्रतिभा या पुरस्काराचे मानकरी वसमत येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका तथा आंतरभारतीच्या उपाध्यक्षा संगीता देशमुख, चतुर्मुखी विनायक माध्यमिक-उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तथा कवी पांडुरंग बोराडे आणि लोळेश्वर येथील जि.प. शाळेचे प्रयोगशील शिक्षक मुंजाजी जोगदंड हे ठरले आहेत.
दि.१७ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता वसमतनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते समाजवादी नेते अॅड. रामचंद्र बागल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
याप्रसंगी पुण्याचे उद्योजक सुदाम भोरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम, प्राचार्य नागनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्रसिध्द व्याख्याते बाजीराव सातपुते हे साने गुरूजी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणार आहेत. या कार्यक्रमाला रसिक, श्रोते, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले आहे.

























