सोलापूर – सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२५–२६ या गाळप हंगामासाठी प्रति मॅट्रिक टन 3001 रूपया दर निश्चित केला असून, परिसरातील इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत अधिक दर देण्याची परंपरा यंदाही कारखान्याने कायम राखली असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी सांगितले
ऊस दराची रक्कम तीन हप्त्यांमध्ये अदा करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिला हप्ता प्रति टन 2500 रूपये तत्काळ अदा करण्यात येणार असून, दुसरा हप्ता प्रति टन 300 रूपये जून महिन्यात दिला जाईल. उर्वरित 201 रुपयाचाअंतिम हप्ता दिवाळीच्या सुमारास अदा करण्यात येईल असेही काडादी यांनी सांगितले.
मागील ६–७ वर्षांपासून कारखान्याला भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे संपूर्ण ऊस दराची रक्कम एकाच वेळी अदा करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे जानेवारीनंतर ऊस गाळपास देणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काही हप्त्यांच्या देयकांमध्ये विलंब होतो, हे यापूर्वी अनुभवास आले आहे.ही बाब लक्षात घेता, सभासद शेतकऱ्यांना वेळेत व सुरक्षितपणे देयके मिळावीत, या उद्देशाने कारखान्याच्या व्यवस्थापनाने हप्त्यांमध्ये ऊस बिल अदा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार पहिल्या हप्ता वेळेत अदा करण्यात येईल, तसेच उर्वरित हप्ते जुनी प्रचलित पद्धत अनुसरून अदा करण्यात येतील.
त्यामुळे सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनम्र आवाहन करण्यात येते की, आपला ऊस फक्त सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासच देण्यात यावा. कारखान्याच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या हितासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
निश्चित काल मर्यादेत हप्ते अदा करणार
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापन सर्व भागधारक, सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठामपणे आश्वस्त करते की, जाहीर केलेले सर्व हप्ते निश्चित कालमर्यादेत अदा करण्यात येतील.
धर्मराज काडादी
संचालक
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना

















