सोलापूर : साखर कारखान्यासमोरील अडचणींवर मात करून श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना ऊस गाळपासाठी सज्ज झाला आहे. शासनाने कारखान्यास 200 कोटींच्या कर्जास हमी दिली असून हा प्रस्ताव आता राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) कडे गेला आहे. ही बाब दिलासादायक असल्याचे सांगून कारखान्याने आजवर इतर कारखान्याच्या तुलनेत चांगला दर दिला आहे . चालू गाळप हंगामातही कारखाना चांगला दर देईल ,असे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी जाहीर केले.
सोमवारी, कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 53 व्या गाळप हंगामाचा शुभारंभ काडादी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला. प्रारंभी कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ऊस भरलेल्या पहिल्या बैलगाडी, ट्रॅक्टर व ट्रकचे तसेच वजनकाट्याचे पूजन करण्यात आले.
यानंतर बोलताना काडादी यांनी, साखर उद्योगासमोरील अडचणी, गतहंगामात कमी झालेले गाळप आणि चालू हंगामातील ऊस गाळपाच्या नियोजनाचा आढावा घेतला.
ते म्हणाले, साखर उद्योग कठीण काळातून जात असला तरी सहकारी तत्त्वावरील सिध्देश्वर साखर कारखान्याने नेहमीच सभासदांच्या उसाला सर्वाधिक दर दिला आहे. गेला एक हंगाम सोडला तर अगोदरच्या सर्व हंगामांत इतर कारखान्यांच्या तुलनेत 100 ते 400 रुपये प्रतिटन जास्त दर देण्याची परंपरा जोपासली आहे. कारखाना सुरू होऊ नये म्हणून काहींनी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा कारखाना कोणाच्या व्यक्तिगत मालकीचा नसून सर्व सभासदांचा आहे. आपला कारखाना म्हणून बघण्याची भूमिका सर्वांनी ठेवली पाहिजे.
एनसीडीसीकडून रक्कम मिळण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शासन पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत,असेही ते म्हणाले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी स्वागतपर भाषण केले.कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज उर्फ पुष्पराज काडादी, संचालक गुरुराज माळगे, शिवशंकर बिराजदार, सुरेश झळकी, राजशेखर पाटील, मल्लिकार्जुन बिराजदार, विद्यासागर मुलगे, अरुण लातुरे, सिध्दाराम व्हनमाने, शिवानंद बगले, अशोक पाटील, शंकर पाटील, काशीनाथ कोडते, हरिश्चंद्र आवताडे, कारखान्याचे माजी संचालक अण्णाराव याबाजी, बाळासाहेब बिराजदार, अण्णाराव भोपळे, सुभाष पाटील, गदगेप्पा कोरवार, अशोक देवकते, अंबणांप्पा भंगे, श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे उपाध्यक्ष सिध्देश्वर बमणी, सचिव नीलकंठप्पा कोनापुरे, अॅड. आर. एस. पाटील, काशीनाथ दर्गोपाटील, मल्लिकार्जुन कळके, रतन रिक्के, पशुपती माशाळ, भीमाशंकर पटणे, शरणराज काडादी, बसवराज माशाळे, काशीनाथ ढोले, अॅड. किरण कनाळे, राजशेखर भरले, विजयकुमार बिराजदार, लक्ष्मण झळकी, अनिल परमशेट्टी, विलास पाटील (कुरुल), रावसाहेब व्हनमाने, मल्लिकार्जुन गुरव, कारखान्याचे सभासद, सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सिध्दराया बबलेश्वर यांनी तर आभार प्रदर्शन संचालक महादेव जम्मा यांनी केले.
राज्य सरकार आणि आमदार कल्याणशेट्टींचे आभार
श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना अडचणीतून मार्गक्रमण करीत असताना शासनाने कारखान्यास 200 कोटींच्या कर्जास हमी देऊन हा प्रस्ताव एनसीडीसीकडे पाठविल्याबद्दल राज्य सरकारचे आणि याकामी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे धर्मराज काडादी यांनी आभार मानले.




















