मोहोळ : शहरातील व्यापारी मोफत वाचनालय येथे वर्तमानपत्र वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीची तीव्र लाट असतानाही वाचनालयात येणाऱ्या वाचकांच्या संख्येत कोणतीही घट न होता उलट वाढच होत असल्याचे दिसून येत आहे.
या वाचनालयात दररोज विविध मराठी, हिंदी तसेच इंग्रजी वर्तमानपत्रांची सोय करण्यात आली असून याचा लाभ मोठ्या प्रमाणावर नागरिक घेत आहेत. विशेष बाब म्हणजे तरुण वर्गाबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचीही उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढली आहे. सकाळच्या वेळेत ज्येष्ठ नागरिक वर्तमानपत्र वाचनासाठी आवर्जून हजेरी लावत असून दुपारनंतर व संध्याकाळी तरुण वर्ग अभ्यासासह चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचनालयात येत आहे.
थंडीचा कडाका असूनही ज्ञानार्जनाची ओढ वाचनालयाकडे खेचत असल्याचे समाधानकारक चित्र असून व्यापारी मोफत वाचनालय हे सामाजिक आणि बौद्धिक केंद्र म्हणून आपली भूमिका प्रभावीपणे बजावत आहे. वाचन संस्कृती जपण्याच्या दृष्टीने हे वाचनालय मोहोळ शहरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
























