सोलापूर – महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी क्रूरकर्मा टिपू सुलतान याची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बुधवारी सोलापूरात तीव्र मूक निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, स्त्रीसन्मानाचे रक्षक आणि प्रशासनाचे आदर्श प्रतीक आहेत. याउलट इतिहासात वादग्रस्त ठरलेल्या टिपू सुलतानची महाराजांशी तुलना करणे हा शिवचरित्राचा अवमान आहे, अशी भूमिका या निदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आली.
यावेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री बालराज डोंतुल, धनंजय बोकडे, दत्तात्रय पिसे, विनोद रसाळ आणि विद्यमान नगरसेवक सत्यनारायण गुर्रम यांच्यासह सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील 50 हून अधिक शिवप्रेमी हातात निषेधाचे फलक धरून सहभागी झाले होते. जुने वालचंद कॉलेज (WIT कॉलेज गेट) समोर सायंकाळ ही निदर्शने शांततेत पण ठाम भूमिकेसह पार पडली. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले वक्तव्य हे संपूर्ण शिवप्रेमी, धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावणारे होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचा अभिमान आहे. त्यांच्या संदर्भात कोणताही अवमान सहन केला जाणार नाही. निदर्शनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक घेत “शिवचरित्राचा अवमान थांबवा”, “वक्तव्य मागे घ्या” अशा घोषणा फलकांद्वारे व्यक्त केल्या. त्याच बरोबर सपकाळ यांचा निषेध करणाऱ्या निवेदनावर स्वाक्षरी घेण्यात आली. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी देखील या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवला.

























