आव्हाना – सिल्लोड ते आव्हाना मार्गे धाड (जि. बुलढाणा) हा विदर्भ व मराठवाडा जोडणारा सर्वात जवळचा व अत्यंत महत्त्वाचा मुख्य मार्ग असून सध्या हा रस्ता केवळ खड्ड्यांमुळेच नव्हे तर मूलभूत सोयींच्या अभावामुळेही अपघातांना थेट निमंत्रण देत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असतानाच दिशा दाखवणाऱ्या पाट्या, गतीरोधक (स्पीड ब्रेकर) व अंतरखुणा पूर्णपणे गायब असल्याचे चित्र आहे.
विदर्भ–मराठवाडा जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात एसटी बसेस, मालवाहू ट्रक, शेतमाल वाहतूक, दुचाकी व चारचाकी वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र रस्त्याची अवस्था इतकी खराब आहे की वाहनचालकांना अंदाजाने वाहन चालवावे लागत आहे. विशेष म्हणजे गावांच्या हद्दीतही गतीरोधक नसल्याने भरधाव वाहनांमुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे.
या मार्गावर कुठे वळण आहे, पुढे गाव येते की धोकादायक ठिकाण आहे, याची माहिती देणाऱ्या दिशा दाखवणाऱ्या पाट्या नाहीत. अंतरखुणा नसल्यामुळे बाहेरील प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी तर हा रस्ता पूर्णतः जीवघेणा ठरत असून अनेक अपघात घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत नेताना, विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाताना तसेच रुग्णवाहिकांना वेळेत रुग्णालयात पोहोचताना या रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इतका महत्त्वाचा मार्ग असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या रस्त्याबाबत आमदार व खासदार यांनी पुढाकार घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तात्काळ खड्डे बुजवणे, कायमस्वरूपी डांबरीकरण करणे, आवश्यक त्या ठिकाणी दिशा दर्शक फलक, गतीरोधक व अंतरखुणा बसवणे अत्यावश्यक आहे. अन्यथा एखादा मोठा अपघात किंवा जीवितहानी झाल्यावर जबाबदारी कोणाची, असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जर लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत, तर नागरिक तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
✍️ — सुरेश पांढरे
आव्हाना प्रतिनिधी
























