जालना : फक्त चार-साडेचार वर्षांची असलेली जालना येथील मधुबन कॉलनीतील रहिवासी सिया प्रितम दांदडे हिने आपल्या कलेच्या जोरावर इन्फ्लुएंसर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवून एक अभूतपूर्व यश संपादन केले असून, ही जालन्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
सिया हिला या उल्लेखनीय यशासाठी पदक, सुवर्ण स्मृतिचिन्ह, इन्फ्लुएंसर बॅच आणि अधिकृत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. लहान वयातही आपल्या कल्पकतेच्या आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर सिया आज एक ओळख निर्माण करत आहे. ती अवघ्या तीन वर्षांची असतानाच व्हिडिओ तयार करू लागली. आज तिच्या प्रत्येक सादरीकरणात कॉमेडी आणि बोधपूर्ण संदेश यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो. सिया मुख्यतः “सासुबाई, सूनबाई आणि नवरा” अशी तिन्ही पात्रं स्वतःच साकारते आणि आपल्या गोंडस अभिनयातून प्रेक्षकांना खळखळून हसवते. तिच्या व्हिडिओंना प्रचंड लोकप्रियता मिळत असून हजारो लोक तिच्या कामावर प्रेम व्यक्त करतात.
या यशामागे तिचे वडील प्रितम वसंतराव दांदडे आणि आई सौ. प्रतिभा प्रितम दांदडे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रेरणा आणि पाठबळ आहे. सध्या हे कुटुंबीय नोकरीमुळे पुणे येथे स्थायिक झाले आहे. सुरेखा वसंतराव दांदडे यांची ती नात आहे. सियाला आतापर्यंत विविध स्तरांवर अनेक पारितोषिके आणि पुरस्कार मिळाले आहेत. तिच्या कलाकृतींना इंस्टाग्रामवर असंख्य आवडी व शुभेच्छा मिळतात. तिचे अधिकृत खाते ‘@siya_dandade_official’ या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच तिच्या युट्युब वाहिनीचे नाव ‘सियाज स्टाईल’ असून सध्या त्या वाहिनीला तब्बल 76 हजार सदस्य आहेत!फक्त अभिनयच नव्हे, तर सिया ला नृत्य करणे, दैनंदिन अनुभवांवर व्हिडिओ तयार करणे (व्लॉग्स) आणि विविध कलात्मक उपक्रमांमध्ये भाग घेणे अत्यंत आवडते. शैक्षणिक क्षेत्रातही सिया नेहमीच आघाडीवर असते. शाळेत ती नेहमी प्रथम क्रमांक पटकवते, यावरून तिच्या सर्वांगीण प्रगतीचा अंदाज येतो. अवघ्या चार-साडेचार वर्षांच्या वयात सियाने गाठलेले हे शिखर केवळ तिच्या कलेचे नव्हे, तर तिच्या पालकांच्या दूरदृष्टीचेही द्योतक आहे. सिया दांदडे हिच्या या यशामुळे जालना जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल झाले आहे!

















