राज्यातील महायुतीत काहीही आलबेल नसल्याचं सातत्यानं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुतीच्या पराभवास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरलं जात आहे. भाजप नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवारांमुळे आमची मतं वाढल्याचं म्हटलं. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकातून थेट अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर, महायुतीमधील काही नेतेही खासगीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोष देत आहेत. त्यावर, आता पहिल्यांदाच अजित पवारांच्या नेत्याने तोफ डागली असून थेट वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराच महायुतीच्या नेत्यांना दिला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या एका बैठकीत अजित पवार यांच्यामुळे आपला पराभव झाला अशा पद्धतीची भावना काही आमदारांनी व्यक्त केली. माझं त्यांना सांगणं आहे की, जर जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात असेल तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल, अशा शब्दात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे, महायुतीत खटके उडत असल्याचं आता समोर आलं आहे.