सोलापूर : परंडा येथील सूफी संतांनी खऱ्या अर्थाने मानवतेच्या कल्याणाची व त्यांच्या सामुहिक विकासाची मांडणी केली. त्यामुळेच हा देश व प्रदेश सुखी, समृद्ध झालेला आहे. सुमारे 700 वर्षांपुर्वी चौदाशे अवलियांच्या पालकीसोबत ख्वाजा सय्यद शाह बद्रोद्दिन चिश्ती औरंगाबाद येथे आले. तेव्हा त्यांचे मुर्शीद दिल्लीचे हजरत निजामोद्दिन अवलिया यांनी त्यांना कोंकणात राहून प्रचार करण्याचे आदेश दिले होते. शेवटी त्यांना परंडा येथे समाधिस्थ राहण्याची आज्ञा होती.
ख्वाजा बद्रोद्दिन साहेब औरंगाबादहून पैठण, परंडा, पुणे मार्गे पणवेलला गेले. तेथे त्यांनी मानवतेच्या कल्याणाचा प्रारंभ केला, असा इतिहास आहे. तिथेच ते शहीद झाले. आपले ‘शिर’ कुटुंबाच्या हवाली करून मुर्शीदांच्या आदेशानुसार ‘शिर’ शिवाय ‘धडा’ने घोड्यावर स्वार होऊन परंडा येथे येऊन समर्पीत झाले. याच ठिकाणी तेव्हापासून या महात्म्याच्या जीवनकार्याची प्रचिती आली व ऊरूसाच्या रूपाने ती चालू आहे. गेल्या सातशे सहा वर्षांपासुन ही परंपरा चालू आहे.
दिनांक 28 डिसेंबरच्या रात्री मुजावरांचा संदल कार्यक्रम होईल. हे संदल मुतवल्ली युनूस आलम सिद्दीकी यांच्या दर्गाह रोड, मुजावर गल्ली येथील घरून निघुन दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 04.00 वाजतां सलाम व फातेहखानी होऊन संदल मिरवणूकीस प्रांरभ होईल. सद्दिवाल यांच्या मानाच्या घोड्यावर गीलाफ फुलांची चादर चढवुन भक्तिभावाने नविन तहसिल कार्यालयात येतो. मुजावर गल्ली, मंगळवार पेठ येथून आलेली फुलांची चादर भक्तगण व मान्यवरांच्या उपस्थितीत सलाम व फातेहा नंतर मानाची चादर तहसिलदार यांच्या डोक्यावर देऊन, घोड्यावर चादर चढवून ऊरूसाच्या मिरवणुकीस प्रारंभ होईल.
दिनांक 28 डिसेंबरच्या रात्री दर्गाह येथे मुजावर व मुतवल्ली युनूस आलम सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनानुसार कुराण पठण, मिलाद, सलाम दुवा नंतर गुसल, संदल व चादर चढविली जाईल. मौलानांचे बयान, फातेह नंतर प्रसाद वाटप करण्यांत येईल. तद्नंतर नियोजित वार्षिक ऊरूसाचे ठराविक कार्यक्रम कलगीतुरा, कव्वाली, भक्तिगीत व मुशायरा होईल.
द्वेष, मत्सर व समाजातील इतर वाईट प्रवृत्ती नष्ट करून समाजात सर्वधर्मसमभाव, प्रेम, बंधुत्व निर्माण करणाऱ्या सुफी संतांच्या शिकवणीचा आदर करण्याची गरज प्रतिपादन करून, मुतवल्ली युनूस आलम सिद्दीकी, ऊर्स कमेटी व समस्त मुजावर यांनी या ऊरूसानिमित्त सर्व भाविकांनी दिनांक 28 ते 31 डिसेंबर, 2025 पर्यंतच्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

























