सोलापूर – देशात तसेच राज्यात सोलापूर बाजारपेठ कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाजारपेठ बनली आहे. कितीही मोठ्या प्रमाणात आवक आली तरीही, सोलापुरातील बाजारपेठेत कांद्याला चांगला दर मिळतो. सोलापुरातील कांदा राज्यासह राज्य बाहेर नव्हे तर देशाबाहेर विकला जातो. त्यामुळे सोलापूर बाजारपेठ कांद्यासाठी एक मोठी बाजारपेठ उद्यास येऊन त्याचे रूपांतर कांदा टर्मिनलमध्ये होऊ शकते. त्यासाठी राज्य केंद्र सरकारकडे प्रयत्नशील राहावे लागेल. असे प्रतिपादन राज्याचे कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी कांद्याची बाजारपेठ साठवणूक दर या विषयांवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ब्रह्मदेव माने बँकेत कांदा परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन स्थानिक बाजार समिती आणि शासनाने शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचा प्रयत्न करावा. सध्या शेतकरी आसमानी संकटात सापडला असून, कांद्याचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. शेतकरी जगला तर राज्य जगणार आहे. कृषी क्षेत्रातील तज्ञ अभ्यासक आणि संशोधकांचे मार्गदर्शन घेऊन सोलापुरात कांद्याच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज तसेच इतर काही सुविधा पुरविण्यात येतील का? याबाबत देखील आढावा घेतला जात आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील प्रत्येक बाजार समितीमध्ये ही बैठक संपन्न होणार आहे. ज्यामध्ये शेतकरी, व्यापारी, आडते आणि स्थानिक बाजारपेठ यांचा समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न असणार आहे. या सर्वांचा एकत्रित रिपोर्ट राज्य आणि केंद्र सरकारला सादर करावयाचा आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माने, संचालक वैभव बरबडे, नागाण्णा बनसोडे, मुस्ताक चौधरी, पुण्यातील एन.आर.सी.सीचे संशोधक डॉ राजीव काळे, पणन मंडळाचे सुहास काळे, पुण्याच्या कृषी विभागाचे श्री.पांढरे, पणन मंडळाचे श्री.जगताप माजी संचालक केदार उंबरजे, व्यापारी एन.एम.खलिफा, रेवणसिद्ध आवजे, श्रीशैल अंबारे, रियाज बागवान उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीत डॉ. राजीव काळे यांनी राज्य शासनाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेची माहिती दिली. या योजनेअंतर्गत कांद्याच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज बांधण्यासाठी सबसिडी तसेच इतर सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले. कांद्याचे उत्पादन केल्यानंतर कांद्याच्या साठवणुकीसाठी शेतकऱ्यांकडे सुविधा नसते. अशावेळी कांद्याचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी कोल्ड स्टोरेज उभारण्याची गरज असल्याचे मत डॉ काळे यांनी व्यक्त करत, राज्य शासनाच्या योजनेची आणि संशोधनाची माहिती विशद केली. या कांदा परिषदेमध्ये सहभागी आडते आणि व्यापाऱ्यांनी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून या योजनेची तसेच कांद्याच्या साठवणुकी संबंधीची माहिती घेतली. तत्पूर्वी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती दिलीप माने यांच्या हस्ते प्रमुख मान्यवर पाशा पटेल यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कांदा परिषदेस व्यापारी, अडते आदींसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कांद्याच्या टर्मिनलसाठी आपण पुढाकार घ्यावा.
सोलापूर बाजारपेठ कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विक्रीसाठी आलेला कांदा सर्वत्र विक्रीला जातो. त्यामुळे सोलापूर कांद्याच्या टर्मिनल मार्केटसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी जागेची उपलब्धता आणि इतर सुविधा प्राप्त करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे प्रयत्न करावे लागतील. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती यासाठी पूर्णपणे सहकार्य करेल. येथील अडते व्यापारी संपूर्ण बाजारपेठ सांभाळतात. त्यामुळे कांद्याचे टर्मिनल भविष्यात होऊ शकते. त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. असे आवाहन कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना केले आहे.
– दिलीप माने, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर.
सोलापुरी हुग्गीवर मारला पाशाभाईंनी ताव
राज्याच्या कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची कांदा परिषद संपन्न झाल्यानंतर सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या भोजनालयामध्ये स्वादिष्ट असे भोजन तयार करण्यात आले होते. यावेळी पाशा पटेल यांनी सोलापुरी हुग्गी, कडक भाकरी, दही शेंगा चटणी, कामगार रुचकर अशा व्यंजनावर ताव मारला. यावेळी त्यांनी भोजनाचे कौतुक केले.
आयोगाच्या निमंत्रित सदस्यांनी केले सोलापूरच्या कांदा बाजारपेठेचे कौतुक
सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस कृषि मूल्य आयोगाचे निमंत्रित सदस्य तथा नाशिक जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी दीपक पगार, पुण्यातील संशोधक व तज्ञ अभ्यासक श्रीकांत कुवळेकर आणि पुण्याच्या कृषी बाजाराचे तज्ञ दीपक चव्हाण हे ऑनलाईन कॉन्फरन्सद्वारे बैठकीस हजर होते. त्यांनी देखील या बैठकीत सोलापूरच्या कांदा बाजारपेठेचे कौतुक करताना सोलापूर कांदा मार्केट टर्मिनल किंवा हब मॉडेल होण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला दर मिळतो. कांद्याचे टर्मिनल किंवा हब मॉडेल झाल्यास शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळेल. यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मनोगत व्यक्त केले.
देशात आणि राज्यात एकच नियम असावा.
देशात आणि राज्यात अडत शुल्कावर सर्व समान नियम असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात अडत व्यापाऱ्यांकडे अडत भरण्याची जबाबदारी दिली आहे. तर इतर राज्यात शेतकऱ्यांवर अडत लादली जाते. महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात कांदा नेण्यासाठी १२ टक्के अडत शुल्क द्यावा लागतो. देशात आणि राज्यात सर्वत्र एकच नियम असावा. एकदाच अडत शुल्क वसूल करावी. दोनदा अडत शुल्क देणे व्यापाऱ्यांना परवडत नाही. यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.
– केदार उंबरजे, कांदा अडत व्यापारी
निर्यात मर्यादा आणि शुल्क यावर ठोस निर्णय हवा.
देशाचे निर्यात शुल्क आणि निर्यात मर्यादा यावर ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. केंद्र सरकार अचानक निर्यात बंदी करते. तर कधी निर्यातीवर मर्यादा लावली जाते. याचा परिणाम सोलापूरच्या कांदा बाजारपेठेवर होतो. देशाबाहेर कांदा पाठवताना व्यापाऱ्यांना अनेक अडचणी येतात. बांगलादेशमध्ये सोलापूरच्या कांद्याची मोठी मागणी असते. परंतु जाचक नियम व अटीमुळे व्यापार होत नाही. यावर अध्यक्ष या नात्याने आपण तोडगा काढावा. असे आवाहन पाशा पटेल यांना केले आहे.
– एन.एम. खलिफा, कांदा अडत व्यापारी
फोटो ओळ – सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कांदा परिषदेस संबोधित करताना राज्याचे कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल संबोधित करताना.. यावेळी सभापती दिलीप माने, संचालक वैभव बरबडे, मुस्ताक चौधरी आदींची उपस्थिती होती.


















