आरक्षणावेळी गावबंदी आणि आता १० टक्के आरक्षण व मनोज जरांगे-पाटलांच्या एसआयटी चौकशीवरून लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची प्रचारावेळी गावागावात कोंडी होत असल्याची सद्य:स्थिती आहे. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंना मोहोळ, पंढरपूर तालुक्यात तसा अनुभव आला. सरकोलीत (ता. पंढरपूर) गेल्यावरही त्यांना तरुणांच्या विरोधामुळे सभा न घेता परतावे लागले. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट झाली असून, बेकायदा जमाव जमवून कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सोलापूर व माढा या दोन्ही मतदारसंघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात आहे. सध्या आचारसंहिता लागू असून, पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेले उमेदवार सध्या गावोगावी प्रचारदौरे करीत आहेत. अजून माढ्यातील महाविकास आघाडीचा तर सोलापुरात भाजपचा उमेदवार ठरलेला नाही. तरीपण, आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वास असलेल्यांनीही प्रचाराला सुरवात केली आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर १२ एप्रिलपासून ५ मेपर्यंत प्रचारासाठी अवधी असणार आहे. प्रचारावेळी सर्वच पक्षांच्या उमेदवारांना गावागावात मराठा आरक्षण व जरांगे-पाटलांची एसआयटी चौकशी आणि त्यावेळी सभागृहातील आपली भूमिका, याची उत्तरे नेत्यांना द्यावी लागतील, अशी स्थिती आहे. तत्पूर्वी, पोलिसांनी सर्वच गावातील तरुणांना कायदा हातात न घेता, प्रचारसभांना कोणताही अडथळा आणू नये, असे आवाहन केले आहे.