कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाणारे सोलापूर आता उत्सवप्रेमी शहर म्हणून ओळखले जाते. येथे दिवसेंदिवस सण-उत्सवांची संख्या वाढत असून मोठ्या आवाजाचे वाद्य लावून महापुरुषांच्या जयंती-पुण्यथिती साजरी करण्याची पद्धत आहे. पण, पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध मंडळांनी आता मोठ्या आवाजाचे वाद्य लावणे कमी केले असून अनधिकृत डिजिटल, फ्लेक्सचे प्रमाणही कमी झाल्याचे पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी सांगितले. आता वर्षाच्या सुरवातीला एक नियमावली तयार केली जाईल आणि प्रत्येक सण-उत्सवावेळी त्याचे पालन करणे सर्वांसाठीच बंधनकारक राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुगल मॅपवर सोलापूर शहर पाहिल्यास नगररचना अतिशय सुरेख दिसते, पण प्रत्यक्षात त्या परिसरातील स्थिती खूपच वेगळी पहायला मिळते. मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण दिसून येते. दमदाटी करून बेकायदेशीर अतिक्रमण करून मोकळ्या जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल होत आहेत. त्यासाठी पोलिस आयुक्तालयात एक स्वतंत्र टिम तयार केली असून पोलिस ठाण्यांकडे आलेल्या अशा तक्रारींचा अभ्यास करून त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जात असल्याचेही पोलिस आयुक्तांनी सांगितले.