तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास (२०२०) पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमांतर्गत, सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग व शंकर शेठ साबळे आय हॉस्पिटल, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दृष्टी मूल्यमापन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हे शिबिर मनपा मुलांची उर्दू केंद्र शाळा, कॅम्प सोलापूर येथे संपन्न झाले. सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळांमधील एकूण ३५७ विशेष विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले.
या कार्यक्रमाला मा. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त श्री. तैमूर मुलाणी यांनी केले. कार्यक्रमास प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री. विठ्ठल ढेपे, सहाय्यक आयुक्त श्री. गिरीश पंडित, एच. व्ही. देसाई हॉस्पिटलचे असोसिएट डायरेक्टर डॉ. सुधीर सुदाल, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथील डॉ. निलेश बागुल आणि नेत्ररोग विभागातील तज्ज्ञ उपस्थित होते.
कार्यक्रमात मुख्याध्यापिका तबस्सुम शेख, पर्यवेक्षक भगवान मुंढे, नीलोफर सय्यद आणि संतोष बुलबुले यांचीही उपस्थिती होती.
या प्रसंगी मा. आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी सांगितले की, समग्र शिक्षण अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमाअंतर्गत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी हे मूल्यमापन करण्यात आले. त्यांच्या दृष्टीच्या गरजेनुसार आवश्यक सेवा पुरविल्या जाणार आहेत.
या सेवांमध्ये
मोफत चष्मे वाटप,
आवश्यक विद्यार्थ्यांसाठी शस्त्रक्रिया,
लो व्हिजन किट,
दिव्यांग प्रमाणपत्र,
ठळक अक्षरातील पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश आहे.
ह्या सेवा एच. व्ही. देसाई हॉस्पिटल व समग्र शिक्षण उपक्रमांतर्गत मोफत पुरविल्या जाणार आहेत. आयुक्त महोदयांनी चष्मा वापरण्याच्या लाजेवर भाष्य करत, त्याचा नियमित वापर करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्रीमती विद्या रोटे (विशेष शिक्षिका) यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अविनाश शिंदे (समन्वयक) यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विशेष शिक्षक व वैद्यकीय तज्ज्ञांनी परिश्रमपूर्वक कार्य केले.