पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सहा हजार ८१६ शेतकऱ्यांच्या विहिरींची कामे पूर्ण होतील, यादृष्टीने जिल्हा परिषदेने नियोजन केले आहे. सोलापूर जिल्ह्यात १४ हजार १४५ विहिरी होणार असून त्यापैकी सात हजार ३२९ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.ऑनलाइन पोर्टलवर विहिरींसाठी नोंदणी केलेल्या पाच हजार ३०० शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून त्यांनाही प्रशासकीय मंजुरी मिळणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना विहिरी दिल्या जातात. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येकी चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. एक एकर शेतजमीन सलग असलेल्या शेतकऱ्यांनाही विहिरीसाठी अर्ज करता येतो.पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक विहिरीपासून ५०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर शेतकऱ्यांना खोदता येते. दोन विहिरींमध्ये किमान १५० मीटर अंतराची अट आहे, पण अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी ही अट लागू नाही.दरम्यान, लाभधारकाच्या सातबाऱ्यावर याआधीच विहिरीची नोंद असू नये. त्यासाठी अर्जासोबत एकूण क्षेत्राचा ८-अ उतारा जोडावा लागतो. विहिरीसाठी अर्ज करणारा शेतकरी हा जॉब कार्डधारक असला पाहिजे अशीही अट आहे.