सोलापूर – भारत देशामध्ये सोलापूर हे एकमेव असे शहर आहे. जे पारतंत्र्यातही तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले आहे. याशहरातील नेत्यांनी आपली देशभक्ती सर्वांना दाखवून दिली. सहकार आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात क्रांती करत सोलापूरचे नाव देशाच्या आणि जगाच्या पाठीवर कोरले. यंत्रमागपासून ते पॉवरलूम असा क्रांतिकारी प्रवास केला. सोलापूरने राष्ट्रीय व सामाजिक एकता जपली. याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी. असे गौरौद्गार देशाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी सोलापुरात एका खाजगी कार्यक्रमात आल्यानंतर काढले.
पुढे ते म्हणाले, सोलापूर हे एक कामगारांचे कष्टकऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. याच कामगाराच्या चळवळीने अनेक नेते उदयास आले. कामगार चळवळ ते सहकार चळवळ असा प्रवास देखील या जिल्ह्यात पहिल्यांदा सुरू झाला. शंकरराव मोहिते पाटील यांनी सहकारातून साखर कारखाना उभा केला, तेव्हापासून सोलापूर शहर जिल्ह्याचे नाव देशाच्या पटलावर आहे. देशाचे तसेच समाजाचे हित सांभाळून जिल्ह्यातील नेत्यांनी सोलापूरचे नावलौकिक केले. असे नेते सोलापुरात होऊन गेले. देशाचे नेते तथा सोलापूरचे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे यांनी देखील सोलापूर जिल्ह्यासाठी आपल्या आयुष्य वेचले. अनेक नेत्यांना उभारी दिली. सन १९८५ रोजी नगरपालिकेत पुंजाल, आडम, मुनाळे, अशा अनेक कामगार नेत्यांनी जबाबदारीने सोलापूर शहराची सामाजिक बांधिलकी सांभाळली. ती जबाबरादी वाखण्याजोगी आहे. राष्ट्रीय स्तरावर नव्या पिढीत नवे नेतृत्व तयार करण्याची गरज आहे. असे देखील शरद पवार यांनी म्हटले.
दरम्यान, सोलापूरचे सुपुत्र तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना, देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार हे आमचे नेते आहेत, त्यांच्यामुळेच मी राजकारणात आलो. राजकारणात आलो नसतो तर, आम्हाला कोण विचारले नसते. त्यामुळे शरद पवार त्यांचे नाव ऐकल्यास मला धडकी भरते. शरद पवार हे राजकारणाचे चाणक्य आहेत. एकाच पक्षात राजकारण सुरू केल्यानंतर दुर्दैवाने कालांतराने पक्ष तुटले गेले. आम्ही वेगळे झालो. परंतु आजही ते आमचे नेते आहेत. पक्षातील मतभेद – मनभेद होत राहतात, परंतु आमचा स्नेह अजून कायम आहे. इतके वय झाले, तरीही शरद पवार हे अजून मनाने तरुण आहेत. मी त्यांच्यापेक्षा साडेआठ महिन्याने लहान आहे. परंतु त्यांची ऊर्जा आणि ताकद ही कौतुकास्पद आहे. शरदराव अजूनही कष्ट घेतात. हे पाहून एक ऊर्जा मिळते. त्यांच्यामुळे राजकारणात येऊन अनेक कामे करता आली. कार्यकर्ते घडवता आले. त्यामुळे आमच्या कामाचे क्रेडिट आम्ही घेणारच. असे वक्तव्य करत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
पुढे ते म्हणाले, एक काळ होता सोलापूरचे शिवदारे, चाकोते, नामदेव जगताप, मनियार असे दिग्गज नेते होऊन गेले. त्यांच्या विचाराने सोलापूरची जडणघडण झाली. तेव्हाचा काळ हा सहकाराचा आणि वस्त्रोद्योगाचा प्रगतीचा होता. अशा नेत्यांच्या विचारसरणीने सोलापूरचा विकास आणि लवलौकिक झाला. अशा दिग्गज नेत्यांच्या सहवासाने आमचे राजकारण सुरू झाले. असेही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. आपल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे यांनी खा.शरद पवार यांच्या कार्याचे आणि त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. सोलापूर शहरात एका कार्यक्रमानिमित्त देशाचे दोन दिग्गज नेते एकत्र येत आपले विचार व्यक्त केले. खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा. प्रणिती शिंदे, आ.अभिजित पाटील, राजू खरे, नारायण पाटील, श्रीकांत मोरे, चेतन नरोटे, भारत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


















