सध्या दहावी- बारावीची परीक्षा काही दिवसांवर आल्याने कॉपीमुक्त परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. १४) बैठक बोलावली आहे. पण, मुलीच्या विवाहामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी मारूती फडके यांनी १२ ते १७ फेब्रुवारीपर्यंत रजेचा अर्ज दिला आहे. तेवढ्या दिवसाच्या रजेवर फडके ठाम असल्याने या बैठकीला कोण जाणार हे निश्चित नाही. दुसरीकडे फडकेंच्या रजेच्या काळात विभागाचा पदभार कोण सांभाळणार हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानतंर या विभागाची जबाबदारी कधी श्री. नाळे तर कधी महिला व बालकल्याण अधिकारी जावेद शेख यांनी सांभाळली. त्यानंतर शासनाकडून मारूती फडके यांची माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक झाली. पण, शालार्थ आयडीच्या प्रस्तावांची छाननी करताना काही मान्यतांची आवक- जावक नोंदवहीच गहाळ असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांत फिर्याद द्यावी लागली.