पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षा अर्ज भरण्याची मुदत जाहीर केली. विलंब, अतिविलंब शुल्कासह कधीपर्यंत अर्ज करायचे हेही प्रसिद्ध केले. मात्र, अद्याप विद्यापीठाला परीक्षांचे वेळापत्रक अंतिम करता आलेले नाही. प्रस्तावित केलेल्या वेळापत्रकावर अजूनपर्यंत निर्णय झाला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. सोलापूर विद्यापीठांतर्गत १०८ महाविद्यालये असून जवळपास ८० ते ८५ हजार विद्यार्थी त्याठिकाणी प्रवेशित आहेत. फार्मसी, लॉ, अभियांत्रिकीसह इतर शाखांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक जाहीर न झाल्याने सध्या ते संभ्रमात आहेत.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी १२ एप्रिलपासून ५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. नेमक्या त्याच काळात विद्यापीठाच्या परीक्षा होतील, अशी सद्य:स्थिती आहे. २० मार्चपासून परीक्षा सुरू करण्याचे नियोजित होते, पण अनेक महाविद्यालयांनी अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याचे कळविल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यापीठाला परीक्षेच्या वेळापत्रक बदल करावा लागणार असल्याचेही बोलले जात आहे. पण, नवीन वेळापत्रक जाहीर करण्यासाठी अजूनही विलंब लागत आहे. त्यामुळे १०८ महाविद्यालयातील ८५ हजार विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष वेळापत्रकाकडे लागल्याचे चित्र आहे.
परीक्षेला विलंब लागल्यास निकाल व नवीन सत्र सुरू करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी स्थिती आहे. त्यामुळे आता परीक्षा कधीपासून सुरू होतात आणि कधी संपतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण, पारंपरिक अभ्यासक्रमांची परीक्षा ३३ दिवसांत संपविण्याचे नियोजन असून सर्व परीक्षा जूनमध्ये संपतील, असे नियोजन केल्याचेही सांगण्यात आले आहे. लांबलेल्या परीक्षांचा निकाल वेळेत न लागल्यास पहिल्या वर्षानंतर दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेताना शाखा बदलास अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होवू शकतात.