सोलापूर : मराठी साहित्यातील जेष्ठ लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘दवणा’ या पुस्तकाच्या अभिवाचन आणि विवेचनास सोलापूरकरांनी प्रतिसाद दिला. शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमालेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी शुक्रवारी डॉ. वंदना बोकील – कुलकर्णी (पुणे) हे ‘दवणा’ या विद्याधर पुंडलिक यांच्या साहित्यावर अभिवाचन व विवेचनाचा कार्यक्रम सादर केला.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट यांच्यावतीने हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात ही व्याख्यानमाला झाली. व्याख्यानमालेचे यंदाचे २९ वे वर्ष होते.
याप्रसंगी व्यासपीठावर मसापाच्या अध्यक्षा डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर, उपाध्यक्ष दत्ता सुरवसे, वेदांत चंडक, प्रमुख कार्यवाह डॉ. नरेंद्र काटीकर, समन्वयक ऍड. जे. जे. कुलकर्णी, बाबुराव मैंदर्गीकर उपस्थित होते.
प्रारंभी विद्याधर पुंडलिक यांच्या ‘दवणा’ या पुस्तकातील अनेक भागांचे वाचन झाले. यानंतर विवेचनही सादर केले. डॉ. अर्जुन व्हटकर यांनी परिचय करून दिला. मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ. नरेंद्र काटीकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुवर्णा गुंड यांनी सूत्रसंचालन तर डॉ. देविदास गुरव यांनी आभार प्रदर्शन केले.
———-
मसाप शाखेचे माजी कार्याध्यक्ष बाबुराव मैंदर्गीकर यांचा विशेष सत्कार
दरवर्षी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राज्यातील एका ज्येष्ठ प्रकाशकाचा सन्मान करण्यात येतो. यंदा हा बहुमान सोलापूरला मिळालेला असून सोलापूरचे ज्येष्ठ प्रकाशक बाबुराव मैंदर्गीकर यांचा सातारा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सत्कार करण्यात येणार आहे. त्याबद्दल बाबुराव मैंदर्गीकर यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
















