भुवनेश्वर – येथे सुरू असलेल्या अंध महिलांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत दुस-या सामन्यात महाराष्ट्रने तेलंगणाचा 67 धावांनी पराभव केला. यात सोलापूरच्या गंगा कदम व नागपूरची महेक बिरघडे या चमकल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्रने निर्धारीत 20 षटकात बिन बाद 232 धावांचा डोंगर रचला. यात सोलापूरच्या गंगा कदम हिने 22 चौकारांच्या मदतीने नाबाद 138 धावा केल्या. तसेच नागपूरच्या महेक बिरघडे हिनेही नाबाद 67 धावांची खेळी केली.
सोलापूरच्या गंगा हिने राष्ट्रीय स्तरावर आजचे हे तिसरे शतक केले आहे. या स्पर्धेत तिने रविवारी उत्तर प्रदेशविरुद्ध व आज सोमवारी तेलंगणाविरुद्ध असे सलग दोन सामन्यात 2 शतके झळकावली आहेत.
प्रतीउत्तरात विजयी लक्ष्य गाठणारा तेलंगणा संघ 19.4 षटकात सर्वबाद 166 धावा करु शकला. गंगाने क्षेत्ररक्षण करताना 1 गडी धावबाद करीत अष्टपैलु कामगिरी केली.
त्यांच्या या नेत्रदिपक कामगिरीबद्दल सोलापूरातील सुप्रसिध्द उद्योजक राजेश दमाणी, भैरुरतन दमाणी अंध शाळेचे सचिव संतोष भंडारी, स्थानिक प्रशिक्षक राजू शेळके, क्रिकेट असोसिऐशन फॉर दि. ब्लाइंन्ड ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष पंकज चौधरी, महासचिव डॉ. माधव गोरे यांनी तिचे अभिनंदन केले.

















