सोलापूर – सोलापूर शहराचे सुपुत्र किरण जोशी, त्यांच्या पत्नी प्रा. दुर्गा जोशी आणि कन्या कु. शांभवी जोशी यांच्या शैक्षणिक, कला आणि संस्कृत क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव नुकताच कोल्हापूर येथे करण्यात आला. २६ ऑक्टोबर रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘गौरवगाथा सन्मान सोहळा’ मध्ये या तिघांनाही मानाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
किरण जोशी यांना ‘एशियन टॅलेंट गोल्डन अवॉर्ड’ शैक्षणिक आणि कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन श्री. किरण जोशी यांना राज्यस्तरीय एशियन टॅलेंट गोल्डन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रा. सौ. दुर्गा जोशी यांना ‘सावित्रीबाई फुले शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार’: संस्कृत अध्यापन क्षेत्रात त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कु. शांभवी जोशी यांना ‘महाराष्ट्र कलारत्न पुरस्कार’: अभिनय आणि कला क्षेत्रातील तिच्या विशेष योगदानाबद्दल कु. शांभवी जोशी हिला महाराष्ट्र कलारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे होते. कोल्हापुरातील शाहू नाट्यगृह येथे हा भव्य सोहळा संपन्न झाला.
यावेळी ‘जुळली गाठ’ या सन मराठी मालिकेतील कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते संजय मोहिते, ज्येष्ठ नाट्य कलावंत भालचंद्र उसगावकर, अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या रजनी शिंदे, बारा बलुतेदार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत शेळके आणि उद्योजक डॉ.बी एन. खरात यांसारख्या नामवंत मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. या तिघांच्याही यशाबद्दल सोलापूर शहरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.

















