मोडनिंब – माढा तालुक्यातील मोडनिंब हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असून ब्रॉडगेज रेल्वे लाईन शेजारी आहे. स्थानिक लोक व व्यापाऱ्यांच्या अनेक वर्षाच्या मागणीनुसार या ठिकाणी शासनाने नवीन एमआयडीसी मंजूर केली. परंतु भूसंपादनाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. तेंव्हा मोडनिंब एमआयडीसीच्या संदर्भातील विविध प्रश्न व अडीअडचणी सोडविण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्याशी चर्चा करून बैठक लावून येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्राद्वारे केली.
यावर पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवून काम मार्गी लावण्याची ग्वाही दिली आहे.मोडनिंब येथील २८०.६७ एकर व सोलंकरवाडी येथील ६३.४७ एकर अशी एकूण ३४४ एकर या जागेची क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून भू-निवड समितीकडून अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. शासनाच्या उच्च अधिकार समितीने या प्रस्थापित क्षेत्रास मान्यता दिलेली असून, या क्षेत्राचा कंटूर सव्हें झाला आहे.
या भागातील औद्योगिक विकासाला चालना मिळून तालुक्यातील शेकडों सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. सदर नवीन एमआयडीसी होण्यासाठी महामंडळाचे प्रकरण ६ लागू झालेले आहे. परंतु संयुक्त मोजणी व भूसंपादनाची कार्यवाही अद्यापपर्यंत करण्यात आली नाही. मोडनिंब येथील नवीन एमआयडीसीचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी उद्योग विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे सोमवार ८ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी रणजितसिंह शिंदे यांनी केली आहे.
माढा तालुक्यातील अरण सबस्टेशन अंतर्गत जाधववाडी, बैरागवाडी व तुळशी येथे नवीन लिंक टाकणे तसेच सोलंकरवाडी सबस्टेशन अंतर्गत मोडनिंब–कुरणखोरा येथे शेतीपंपांसाठी नवीन लिंक लाईन मंजूर करण्याबाबत रणजितसिंह शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली. अपुरा व अनियमित वीजपुरवठा होत असल्याने ही कामे तातडीची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या निवेदनाची दखल घेत पालकमंत्री गोरे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंत्यांना पुढील कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिल्याने संबंधित भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
जाधववाडी (ता. माढा) येथील खंदारे पाझर तलावात सिना माढा योजनेतून पाणीबंद पाईपलाईन करून भरणे साठी कालवा ते पाझर तलाव पर्यंत ६०० मी. चारी खोदाई करण्यासाठी डी.पी.डी.सी अंतर्गत निधीची तरतूद करावी. या कामाची मागणी निवेदनातून करण्यात आली.तसेच माढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामाच्या संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सोबत चर्चा झाली असल्याचे सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले.



















