बार्शी – महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान– टप्पा क्रमांक १ अंतर्गत बार्शी तालुक्यातील विविध मंडळांमध्ये समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या अंतर्गत दि. १४ मार्च २०२६ रोजी नारी, पानगाव आणि सुर्डी मंडळात सकाळी ९ ते सायं. ५ या कालावधीत शिबिरे पार पडली. या शिबिरांमध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यात आले तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देऊन लाभही वितरीत करण्यात आले.
पानगांव मंडळ
पानगांव येथे आयोजित शिबिरास पंचायत समिती सभापती मीनाक्षीताई रोंगे, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदृणे, तहसीलदार एफ.आर. शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह सुमारे ४०० ते ५०० ग्रामस्थ उपस्थित होते.
नारी मंडळ
नारी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित शिबिरात नायब तहसीलदार रविंद सानप, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच स्थानिक सरपंच उपस्थित होते. मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आशा वर्कर तसेच विविध विभागातील कर्मचारी यांची उपस्थिती होती. या शिबिरात ६०० ते ७०० लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला. नारी मंडळातील कारी गावातील शाळेत विशेष शिबीर घेऊन सुमारे १७० दाखले वितरीत करण्यात आले.
सुर्डी मंडळ
सुर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित शिबिरात निवासी नायब तहसीलदार, जिल्हा परिषद सदस्य सुजाता डोईफोडे, पंचायत समिती सदस्य विमल काटे आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक व विविध विभागांचे कर्मचारी सहभागी झाले. या शिबिरात ५०० ते ६०० ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
शिबिरामध्ये विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी
शिबिरांमध्ये महसूल विभागासह आरोग्य, पंचायत समिती, आधार सेवा केंद्र आदी विभागांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
आरोग्य विभागामार्फत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. १८ वर्षाखालील मुलांचे नवीन आधार कार्ड व नाव, पत्ता, जन्म तारीख दुरुस्ती करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी प्रलंबित EKYC प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अधिकार अभिलेखातील तांत्रिक चुका दुरुस्त करण्यात आल्या. सामाजिक सहाय्य योजनेंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीमार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट देण्यात आले. घरकुलासाठी वाळू पास वितरण, महा-DBT अंतर्गत शेतीसाठी साहित्य वितरण तसेच ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. गरोदर व स्तनदा मातांना बेबी किट देऊन आरोग्य तपासणी करण्यात आली.
अपाक खातेदारांचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अपाक शेरा कमी करण्यात आला. लागवडीखाली आणलेल्या पोटखराब क्षेत्राची दुरुस्ती करून ७/१२ उतारे वितरीत करण्यात आले. मंजूर शेतरस्त्यांची नोंद ७/१२ मध्ये करण्यात आली.
शिबिरातील कामकाजाची आकडेवारी
शिबिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली.
फेरफार निकाली काढले : ११३, ७/१२ मधील दुरुस्त्या : ४१, डिजिटल ७/१२ उपलब्ध : ४३०, ८-अ उतारे वितरीत : २९७, विविध प्रमाणपत्रे (उत्पन्न, रहिवासी, जात, नॉन-क्रिमीलेअर इ.) : १०१०, एक खिडकी अंतर्गत निकाली अर्ज : ६५४, भूसंपादन प्रकरणी कमी-जास्त पत्रके : ५, अकृषक प्रकरणी कमी-जास्त पत्रके : ५
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानाच्या पुढील टप्प्यात दि. १० एप्रिल २०२६ रोजी गौडगाव व उपळे (दु.) मंडळात सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये संबंधित मंडळातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार बार्शी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
























