नवीन नांदेड – क्रीडा भारती, देवगिरी प्रांत यांच्या पुढाकाराने दिनांक २३जानेवारी रोजी सकाळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील क्रीडा संकुल मैदानावर कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या खेळाद्वारे सध्या सोशल मीडियाचा विद्यार्थ्यांच्या डोक्यावर झालेला परिणाम काहीसा दूर होऊन विद्यार्थ्यांचे लक्ष स्वतःच्या करिअरकडे लागले पाहिजे हा मुख्य उद्देश या स्पर्धेचा होता. ही स्पर्धा डॉ.सिंकुकुमार सिंह त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजत करण्यात आली होती. या स्पर्धेस प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर नांदेड शहरातील बरेच विद्यार्थी पोलीस भरती सारख्या अन्य भरतीची तयारी करण्यासाठी या ठिकाणी मुली व मुले तयारी करण्यासाठी रोज येत असतात ही बाब लक्षात घेऊन डॉ. सिंकूकुमार सिंह यांनी येथील मुलांचे व मुलींचे संघ तयार करून या स्पर्धेत पुरुष विरुद्ध पुरुष, महिला विरुद्ध महिला तसेच महिला विरुद्ध पुरुष अशा गटांमध्ये थरारक सामने खेळविण्यात आले. एकूण सहा संघांनी सहभाग घेतला असून त्यामध्ये दोन महिला संघ व चार पुरुष संघांचा समावेश होता. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडा कौशल्य, शिस्तबद्ध खेळ आणि खऱ्या क्रीडाभावनेचे दर्शन घडविले.
या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. चंद्रकांत कराड, प्राचार्य, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, उदगीर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. ही स्पर्धा क्रीडा भारती, देवगिरी प्रांतचे उपाध्यक्ष डॉ. सिंकुकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. पंच म्हणून भीमा केंगले, डॉ. धनंजय शिर्साठ, डॉ. परस यादव, डॉ. कुलजीतसिंह, आकाश डगलस, पूनम जाधव, सुभांगी व सोहन सोनकांबळे यांनी निष्पक्षता व शिस्त राखून आपली भूमिका बजावली.सदरील खेळाद्वारे आरोग्यदायी जीवनशैली, सामाजिक एकात्मता व क्रीडा संस्कृतीला चालना देणारे हे आयोजन निश्चितच प्रेरणादायी व अभिनंदनीय ठरले.





















