टेंभुर्णी : माणसाच्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे निरोगी शरीर. निरोगी शरीरातच प्रसन्न मन व सकारात्मक विचार विकसित होतात. त्यामुळे सदृढ शरीराचा पाया भक्कम करण्यासाठी बालपणापासूनच योग्य प्रयत्न करणे आवश्यक आहे, या उद्देशाने प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल, हरिनगर बेंबळे येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन महाराष्ट्राचे नामवंत मल्ल, ५१ गद्याचे मानकरी व महान महाराष्ट्र केसरी असलम काझी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर जिद्द व महत्त्वाकांक्षेचे प्रतीक असलेल्या मशालीचे पूजन करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या ब्ल्यू, रेड, ग्रीन व यलो संघांनी संयुक्त मानवंदना दिली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते. पत्रकार दिनाचे औचित्य साधून टेंभुर्णी व बेंबळे परिसरातील नामवंत पत्रकारांचा सन्मान सोहळा आनंदी वातावरणात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
याप्रसंगी हरिश्चंद्र गाडेकर सर व दत्तात्रय सुरवसे यांनी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्याबद्दल आभार व्यक्त करून विद्यार्थ्यांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सचिव बी. बी. इंगळे सर यांनी संस्थेची प्रगती, शैक्षणिक वाटचाल व राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात महान महाराष्ट्र केसरी असलम काझी यांनी खेळाच्या माध्यमातून स्वतःचा जीवनप्रवास कसा घडला, तसेच खेळातून जिद्द, संघर्ष, हार-जीत स्वीकारण्याची तयारी व जीवनातील खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रभावीपणे समजावून सांगितले.
या क्रीडा सप्ताहात कबड्डी, खो-खो, धावणे, लिंबू-चमचा, हॉलीबॉल व गोळा फेक अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय पोपटतात्या अनपट साहेब, संस्थेचे सचिव बी. बी. इंगळे सर, कार्यक्रमाचे मार्गदर्शक व संस्थेचे प्राचार्य समीर तांबोळी सर, सर्व संचालक मंडळ, पत्रकार बांधव, पालक, क्रीडा शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.


















