एलएलसीच्या कमिश्नरने श्रीशांतला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. बुधवारी व्हिडिओ जारी करताना श्रीशांतला गंभीरने ‘फिक्सर’ संबोधल्याचा आरोप केला होता.
लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये गौतम गंभीरसोबत झालेल्या वादानंतर एस श्रीशांत सध्या अडचणीत सापडला आहे. लिजेंड्स लीग क्रिकेटच्या कमिश्नरने वेगवान गोलंदाज श्रीशांतला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. बुधवारी व्हिडिओ जारी करताना श्रीशांतने गंभीरने त्याच्यावर कोणतेही कारण नसताना शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. नंतर इंस्टाग्राम लाइव्हमध्ये श्रीशांतने सांगितले होते की गंभीरने त्याला अनेक वेळा “फिक्सर” म्हटले होते आणि यामुळे वाद निर्माण झाला होता.
रिपोर्टनुसार, नोटीसमध्ये लिहिले आहे की, टी-२० स्पर्धेत खेळताना श्रीशांत त्याच्या कराराचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, वेगवान गोलंदाज श्रीशांतने त्याच्या सोशल मीडिया पेजवरून सामन्यादरम्यान खेळाडूवर आरोप करणारा व्हिडिओ काढून टाकल्यावरच त्याच्याशी बोलणी सुरू केली जाईल. गंभीर आणि श्रीशांत यांच्यातील या वादात पंचांनी त्यांचा अहवालही पाठवला होता, मात्र श्रीशांतला ‘फिक्सर’ म्हटल्याच्या आरोपाबाबत काहीही सांगितले गेले नाही.
श्रीशांतचे व्हिडिओद्वारे गंभीरवर मोठे आरोप
६ डिसेंबर रोजी, लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात एलिमिनेटरचा सामना झाला, ज्यामध्ये गंभीर आणि श्रीशांतमध्ये जोरदार वाद झाला. ही घटना ६ षटकांचा खेळ संपल्यानंतर घडली, तोपर्यंत कॅपिटल्सने एकही विकेट गमावली नव्हती आणि त्यांच्या ६० धावा झाल्या होत्या. सलामीवीर म्हणून गंभीरने ५१ धावांची शानदार खेळी केली. व्हायरल व्हिडिओमध्ये, गंभीर आणि श्रीशांत एकमेकांच्या जवळ जात जोरदार वाद घालताना दिसत आहे. यादरम्यान इतर खेळाडू श्रीशांतला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, दोघांमध्ये काय झाले हे व्हिडिओवरून स्पष्ट झालेले नाही कारण हा व्हिडिओ स्टँडमध्ये बसलेल्या कोणीतरी बनवला आहे.
एस श्रीशांतने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करताना गंभीरवर मोठे आरोप केले होते. तो म्हणाला होता, “मला मैदानावर “मिस्टर फायटर” सोबत काय झाले हे स्पष्ट करायचे आहे, हा फायटर नेहमी विनाकारण त्याच्या सहकाऱ्यांशी भांडतो. तो आपल्या वरिष्ठ खेळाडूंचाही आदर करत नाही. आजही तेच झाले. मी त्याला काहीही बोललो नाही पण तो माझ्याकडे आला आणि असं काही बोलला जे चांगले नव्हते आणि श्रीमान गंभीरने असे बोलायला नको होते.” हा व्हिडीओ त्याने मैदानात असताना बनवला होता. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंमध्ये सोशल मीडियावर युद्ध सुरूच आहे.
 
	    	 
                                

















 
                